नारायण गावस पणजी : चिंबल पंचायतीचे सरपंच संदेश शिराेडकर हे गुंडाराज करत असून स्थानिक लोकांवर अन्याय करत आहे. त्यांना जाब विचारायला गेल्यावर आमच्यावर खाेट्या तक्रारी दाखल करून मारहाण करण्यात येत असल्याचा आरोप करत आरजी पक्षाचे खजिनदार अजय खाेलकर यांनी त्यांच्या विरोधात निदर्शने केली.
चिंबलच्या अर्चना काणकाेणकर या विधवा महिलेने कायदेशीर घर बांधले; पण चिंबल पंचायतीने ते बेकायदेशीर असल्याचा दावा करत ते पाडण्याची ऑर्डर काढली आहे, तर परप्रांतीय लोकांना येथे बेकायदेशीर घरे बांधण्यात परवानगी देत आहेत. आपल्या पंच सदस्यांना बेकायदेशीर बांधकाम करायला परवानगी दिली जाते. चिंबल पंचायतीच्या वेबसाइटवर चिंबलची बदनामी करणाऱ्या पोस्ट काेणी टाकल्या, तसेच लाेकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ग्रामसभा का घेत नाही? या सर्व प्रश्नांचे सरपंच संदेश शिरोडकर यांनी स्पष्टीकरण द्यावे. अन्यथा त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी अजय खाेलकर यांनी केली आहे.
संदेश शिरोडकर हे भाजप समर्थक सरपंच असून, ते आरजीच्या कार्यकर्त्यांना धमकावत आहेत; पण आम्ही आरजीचे सदस्य गप्प बसणार नाही. या एसटी समाजाच्या विधवा महिलेवर अन्याय झाला तर सरपंचांना राजीनामा द्यावा लागणार आहे, असेही अजय खाेलकर यांनी सांगितले. चिंबल पंचायतीत माेठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकाम सुरू आहे. त्यांना या सरपंचाकडून परवानगी मिळत असते, तसेच यात सर्व पंच सदस्यांचाही समावेश आहे. या चिंबल पंचायतीत पंचायत राज नसून फक्त गुंडाराज सुरू आहे, असा आरोपही अजय खाेलकर यांनी केला आहे.