लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : देशात जनतेचा निधी सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्रातून भाजप सरकारला हटवण्याची गरज असल्याचे काँग्रेसचे दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष सावियो डिसोझा यांनी सांगितले. एलआयसी व एसबीआयचा निधी अदानी कंपनीने आर्थिक बाजारपेठेत वापरून त्यांचे शेअर्स घसरल्याने जनतेचा निधी संकटात सापडलेला आहे. त्या निषेधार्थ काँग्रेसने आज येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर अदानी कंपनीच्या निषेधार्थ निदर्शने केली.
केंद्र सरकारच्या सहकाऱ्याने अदानी कंपनीने देशाला लुटले आहे. केंद्रीय वित्त खातेही अदानी कंपनीची बाजू घेत आहे. आर्थिक बाजारपेठेत अदानी कंपनीचे शेअर्स घसरल्यामुळे देशाची आर्थिक बाजू कमकुवत ठरली आहे. आहे. अदानी कंपनीचा हा आर्थिक महाघोटाळ्याला वेळीच लगाम न घातल्यास देश आर्थिक संकटात सापडणार आहे.
अदानी कंपनीने एलआयसी व एसबीआयचा निधी आपल्या शेअर्समध्ये वापरला होता. केंद्र सरकारने वरील निधी वापरण्यासाठी अदानी कंपनीला परवानगी दिली होती. सध्या आर्थिक बाजारपेठेत अदानी कंपनीचे शेअर्स जमीनदोस्त झाले असून, एलआयसी व एसबीआयचा निधी अर्थात जनतेचा निधी आर्थिक बाजारपेठेत वाया गेल्यातच जमा आहे. या व्यवहाराला केंद्र सरकारच जबाबदार असल्याचे डिसोझा यांनी सांगितले. केंद्रातील भाजप सरकार महाघोटाळेबाज असल्याचे काँग्रेस पक्ष गेल्या अनेक दिवसांपासून सांगत आहे; पण जनतेने पूर्णपणे काँग्रेस पक्षाच्या विधानाकडे दुर्लक्ष करून पुन्हा भाजपलाच सत्तेवर बसवले.
भाजपकडून देशाची विक्री करण्याचा प्रकार
भाजप सरकारने देशाची संपत्ती खासगी कंपन्यांच्या स्वाधीन करून आपल्या देशाची विक्री केली आहे. अदानी कंपनीचे शेअर्स घसरल्याने त्याचा विस्फोट झालेला आहे, असे प्रदीप नाईक यांनी सांगितले.
गोव्यात सरकारने एमपीटी पोर्ट, रेल्वे ट्रान्सपोर्ट व नद्यांचा ताबा अदानी कंपनीकडे दिलेला आहे. ही सगळी जनतेची संपत्ती आहे. सरकारने या सर्व प्राधिकरणांचा करार अदानी कंपनी रद्द करून घ्यावा, अशी मागणीयावेळी करण्यात आली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"