ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 17 - मांडवी नदीत आलेल्या पाचव्या कॅसिनोविरुद्ध मोठा जनक्षोभ तयार होऊ लागला आहे. बिठ्ठोण-पेन्ह द फ्रान्स गावाच्या पट्टय़ात मांडवी नदीत आम्हाला पाचवा कॅसिनो नकोच. बंदर कप्तान खात्याने बिठ्ठोणच्या बाजूने असलेले मुरींग येत्या पाच दिवसांत काढून टाकले नाही तर लोकांसोबत आम्हीच ते काढून टाकू व कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सरकार जबाबदार ठरेल, असा इशारा पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी येथे शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला.अपक्ष आमदार खंवटे व काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. भाजप सरकार गोमंतकीयांची सर्व बाजूने थट्टा व फसवणूक करत आहे. मांडवीत चारच कॅसिनो राहतील, असे सरकार सांगत होते; पण पाचवे फ्लोटेल तथा कॅसिनो मांडवीत आणून ते रायबंदर येथे ठेवले आहे. बिठ्ठोण-पेन्ह द फ्रान्सच्या याच परिसरात चर्च व मंदिर असून कॅसिनो आणल्यानंतर त्या परिसरात सर्व प्रकारची गैरकृत्ये सुरू होतील. किनारी भागात सध्या मुली व महिला जशा असुरक्षित बनल्या आहेत, तसाच प्रकार बिठ्ठोण-पेन्ह द फ्रान्सच्या पट्टय़ात होईल, असे त्यांनी सांगितले.
भाजप आमदार पे रोलवर
आमदार रेजिनाल्ड यांनी या वेळी किनारपट्टीतील भाजपचे आमदार कॅसिनो व्यावसायिकांच्या पे रोलवर असल्याचा आरोप केला. सर्व समविचारी लोकांनी एकत्र येऊन मांडवीत पाचव्या कॅसिनोला विरोध करावा. मनोहर र्पीकर जेव्हा विरोधी पक्षनेते होते, तेव्हा ते कॅसिनोंमुळे मांडवीतून दरुगधी येते, असे म्हणत होते. आता र्पीकर यांना दरुगधी येत नाही का, असा प्रश्न रेजिनाल्ड यांनी केला.
आता आलेला पाचवा कॅसिनो मांडवी नदीत राहू नये असे मलाही वाटते. माङया सरकारने कोणत्याही नव्या कॅसिनोला परवानगी दिलेली नाही. अगोदर मांडवीत पाच कॅसिनो होते. नंतर त्यांची संख्या चार झाली. आता आलेला कॅसिनो हा नवा नव्हे. पूर्वीचाच परवाना पाचव्या कॅसिनोकडून वापरला जात आहे. मांडवी नदीतील कॅसिनोंना पर्यायी जागा द्यावी लागेल. आम्ही त्यांचे परवाने रद्द करून धंदा बंद करू शकत नाही. विरोधकांना बोलायला सोपे आहे. कॅसिनो व्यावसायिकांनी गुंतवणूक केलेली असून परवाने रद्द केल्यास ते न्यायालयात जातील आणि स्थगिती आणतील. - लक्ष्मीकांत पार्सेकर, मुख्यमंत्री, गोवा