पणजी - गोव्यात सध्या लाखो पर्यटक आलेले असून सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यास सरकारने बंदी लागू केलेली असली तरी, या बंदीचे उघडपणो आणि राजरोस उल्लंघन सध्या सुरू आहे. पोलिस यंत्रणा त्याविरोधात काहीच कारवाई करू शकलेली नाही.सार्वजनिक ठिकाणी राज्यात मद्य प्यायचे नाही असा आदेश काही महिन्यांपूर्वी सरकारने जारी केला. उघडया जागेत मद्यपान करणा-यांविरुद्ध प्रारंभी पोलिसांनी कारवाई केली व काही गुन्हे नोंद केले. पोलिसांच्या कारवाईचे गोमंतकीयांनी स्वागतही केले होते. घाऊक दारू विक्रेत्यांकडून बाटलीतून मद्य विकत घेतल्यानंतर तिथेच दुकानाबाहेर उभे राहून दारू प्यायची व जाताना बाटली किंवा बियरचा कॅन तिथेच फेकून द्यायचा असे प्रकार पोलिसांच्या कारवाईवेळी काही महिन्यांपूर्वी बंद झाले होते पण आता मोठय़ा प्रमाणात हे प्रकार नव्याने सुरू झाले आहेत.
नाताळ आणि नववर्ष साजरे करण्यासाठी देशी व विदेशी पर्यटक लाखोच्या संख्येने किनारपट्टीत दाखल झाले असून अशा पर्यटकांपैकीच अनेकजण दिवसा व सायंकाळी उशिरा उघडय़ावर दारू पित बसले असल्याचे दिसून येत आहे. पर्यटकांचे गट विविध ठिकाणी बसलेले असतात व ते मद्य पितात आणि जाताना बाटल्याही तिथेच टाकून देतात.
उत्तर गोव्यातील दोनापावल, करंजाळे, मिरामार, बागा, कळंगुट, ह्या किनारपट्टीमध्ये असे प्रकार जास्त आढळून येऊ लागले आहेत. बंदोबस्तासाठी फिरणारे पोलिस अशा पर्यटकांना काही विचारत देखील नाहीत. केवळ किनारपट्टीतच नव्हे तर राजधानी पणजीसारख्या शहरात देखील कुठेही पर्यटक सायंकाळी मद्यपित बसलेले असल्याचे दिसून येते. अनेकदा रस्त्यांच्या कडेलाच ते बसलेले असतात. करंजाळे येथे समुद्रकिना:यावर जाण्यासाठी मुख्य रस्त्यापासून छोटी वाट असून त्या वाटेवर तर गाडय़ा उभ्या करून गोमंतकीय देखील मद्य पित असल्याचे दिसून येते. पणजीत प्रथमच दारू दुकानांच्या बाहेर मद्य विकत घेण्यासाठी पर्यटकांच्या अक्षरश: रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
गोव्याच्या ग्रामीण भागात पर्यटन व्यवसाय पोहचायला हवा म्हणून सरकार प्रयत्न करत आहे. त्याचा एक उलटा परिणाम सध्या ग्रामीण भागात दिसून येत आहे. डिचोली तालुक्यातील काही पंचायत क्षेत्रंतील ग्रामीण भागात पर्यटक आणि स्थानिक देखील उघडय़ावर दारू पित बसतात आणि तिथेच अगदी रस्त्याच्या कडेला रिकाम्या बाटल्या फेकून देतात. अशा बाटल्यांचा खच पडलेले फोटोही काही जागृत ग्रामस्थांनी काढून ते पोलिसांना व पंचायतींना सादर केले आहेत. कच:याची समस्याही अशा प्रकारांमुळे वाढते व परिसर गलिच्छ दिसतो.