पणजी : काश्मिरमधील पुलवामामध्ये गुरुवारी (14 फेब्रुवारी) झालेल्या भारतीय जवानांवरील हल्ल्याविरुद्ध गोव्यातही अत्यंत संतप्त अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व सामाजिक संस्था आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहेत. गोव्यात निषेधाचे कार्यक्रमही सुरू झाले आहेत.
पाकिस्तानला अद्दल घडवा, दहशतवाद खत्म करा अशा प्रकारचे संदेश गोमंतकीयांकडून सोशल मीडियावर खूप मोठ्या संख्येने पोस्ट केले जात आहेत. दहशतवाद्यांना कुणीच पाठींबा देऊ नये, पाकला कठोर प्रत्युत्तर द्यावे अशा प्रकारची मागणी करणारे पोस्ट गोमंतकीय नागरिकांकडून फेसबुक, ट्वीटरवर टाकले जात आहेत. व्हॉट्सअॅपवरही हल्ल्याच्या निषेधाचेच संदेश फिरविले जात आहेत.
गोव्यातील काही उद्योजक, काही वकील, सामाजिक कार्यकर्ते, आरटीआय कार्यकर्ते यांनी लोकमतशी बोलतानाही हल्ल्याचा निषेध केला व पाकविरुद्ध कारवाई करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती दाखविण्याची वेळ आली आहे, असे मत व्यक्त केले. ज्या सैनिकांचे बळी गेले, त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी एकत्र येऊया अशी आवाहने गोमंतकीयांनी सोशल मीडियावरून करणे सुरू केले आहे. सत्तरी तालुक्यातील पत्रकार संघाने वाळपई शहीद स्तंभाकडे एकत्र येऊन आपण वीर जवानांना श्रद्धांजली वाहूया असे म्हटले आहे.
दरम्यान, गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री तथा देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनीही हल्ल्याचा निषेध करून आपल्या भावना ट्वीटरवरून व्यक्त केल्या आहेत. सीआरपीएफ जवानांवरील हल्ला हा माणुसकीविरुद्धचा भ्याड हल्ला आहे. शांततेसाठी भारताने केलेला निर्धार म्हणजे कमकुवतपणा आहे असे कुणी समजू नये. भारत देश पूर्णपणे सीआरपीएफ, शहीद जवान आणि त्यांच्या कुटूंबियांच्या मागे ठामपणे उभा राहत असल्याचे पर्रीकर यांनी नमूद केले आहे.