राज्यभर सध्या पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. दारू पिऊन वाहन चालवतात, त्यांना पोलिस दंड ठोठावत आहेत. सायंकाळी व रात्री कार किंवा अन्य वाहने थांबवून अल्कोमीटरचा वापर केला जात आहे. चालकाने किती प्रमाणात मद्य घेतले आहे, हे शोधून दंड दिला जात आहे. बार्देश, तिसवाडी, सासष्टी, फोंडा, मुरगाव अशा तालुक्यांमधील अनेक चालक गेल्या चार दिवसांत सापडले आहेत. कुणी दुचाकी तर कुणी चारचाकी चालवताना मद्याच्या नशेत होता, हे अल्कोमीटरद्वारे पोलिसांनी तपासून पाहिले. प्रत्येक शहरात व किनारी भागात अनेक चालकांविरुद्ध कारवाई झाली आहे. पोलिसांची ही मोहीम सुरूच राहायला हवी. कारण बाणस्तारी येथील भीषण वाहन अपघातात तिघांचे जीव गेले. शिवाय जे तिघेजण जखमी झाले, त्यापैकी एकाच्या वाट्याला अपंगत्व आले आहे. म्हणजे परेश सावर्डेकर हा मर्सिडीज चालक तीन-चार व्यक्तींना उद्ध्वस्त करण्यात यशस्वी ठरला. अतिमद्यप्राशन करून बेजबाबदारपणे सावर्डेकरने वाहन चालविले. या अपघातात दिवाडी येथील फडते दाम्पत्य ठार झाले. लोकांमध्ये अजून या अपघाताविषयी प्रचंड राग आहे.
श्रीमंत कुटुंबातील व्यक्तीने दारूच्या नशेत हा अपघात घडविला. शिवाय पोलिसांनी सावर्डेकर व त्याच्या पत्नीला लगेच संरक्षण दिले व पणजीला घरी पोहोचविले तिघांचा जीव जाऊनही पोलिसांनी वाहनचालकास लगेच ताब्यात घेण्याचे धाडस दाखवले नाही. त्याला जाऊ दिले. जनतेच्या रोषाची कल्पना आल्यानंतर परेश सावर्डेकरला अटक झाली. काल सावर्डेकरला पोलिसांनी न्यायालयासमोर उपस्थित केले. आणखी एक दिवसाची पोलिस कोठडी वाढवून मिळाली. यापुढे जामिनावर सावर्डेकर सुटेलदेखील. मात्र त्यानंतर अपघातातील साक्षीदारांना कुणी आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न करू नये म्हणून पोलिसांना काळजी घ्यावी लागेल. पोलिसांच्या तपास कामाविषयी लोकांना संशय आहेच. साक्षीदारांना विकत घेतले जाऊ नये म्हणून पोलिसांना अधिक दक्ष राहावे लागेल. हायप्रोफाइल मंडळी अपघाताच्या एकूण प्रकरणात गुंतलेली आहेत. गोवा सरकार या अपघाताविषयी जास्त काही बोलत नाही. जखमींना पाहण्यासाठी मुख्यमंत्री सावंत व मंत्री गोविंद गावडे हे बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात गेले होते. संतप्त जनभावनेची कल्पना आल्यानंतर राज्यकर्त्यांनी इस्पितळात धाव घेतली.
संपूर्ण गोव्यात परेश सावर्डेकरच्या कृतीवर टीका होत आहे. अपघातातील एका जखमीला पाय व हात गमवावा लागला. हे तर फार धक्कादायक आहे. चालकाकडून झालेले हे महापापच आहे. याप्रकरणी तपास व्यवस्थित झाला तरच चालकाचा गुन्हा सिद्ध होईल. सदोष मनुष्यवधाचे कलम पोलिसांनी लावले आहे. यापूर्वी गोव्यात अपघातप्रकरणी चालक पुराव्यांअभावी न्यायालयातून सुटल्याची उदाहरणे आहेत. काही बसचालकही यापूर्वी दुसऱ्याचा बळी घेऊन सुटले आहेत. गोवा पोलिस अशा अपयशासाठी प्रसिद्ध आहेत. सावर्डेकरने बाणस्तारीला जो अपघात घडवून आणला, तो निव्वळ अपघात नव्हे. वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी म्हटल्याप्रमाणे बाणस्तारीत तिघांचे खूनच झाले आहेत.
वाहनचालक प्रचंड मद्य प्यायला होता. वास्तविक पोलिसांनी वाहनचालकाच्या पत्नीचीदेखील त्यावेळीच मद्य चाचणी करायला हवी. होती. पत्नी मेघनादेखील त्या रविवारी पार्टीत सहभागी झाली होती. तीही मर्सिडीजमध्ये होती. तिने आता पोलिसांच्या नोटिसांविरुद्ध न्यायालयात धाव घेतली आहे. पोलिसांनी आपल्याला अटक करू नये म्हणून ती काळजी घेत आहे. कुंभारजुवे व दिवाडी येथील लोकांनी सलग दोन दिवस म्हार्दोळ पोलिस स्थानकावर मोर्चा नेला व मेघनाच्या चौकशीची व अटकेची मागणी केली तेव्हाच पोलिसांना जाग आली. आता पोलिस कामाला लागले असले तरी मेघनाकडून पोलिसांना हवे तसे सहकार्य मिळत नाही. कायद्याची लढाई पती व पत्नीने सुरू केली आहे. असा अपघात गोव्यात पुन्हा घडू नये म्हणून मद्यपी चालकांमध्ये पोलिसांना दहशत निर्माण करावीच लागेल. भाजपचे कळंगूटचे आमदार मायकल लोबो यांची भूमिका काहीही असो, पण मोठ्या मद्यालयांबाहेर काही दिवस पोलिसांना थांबावेच लागेल. म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतोय.