लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: डिचोली नगरपालिकेच्या राजकारणात उघडपणे दोन गट पडल्याचे दिसून आले होते. तो रोखण्यासाठी भारतीय जनता पक्षाने प्रचंड प्रयत्न केला. पक्षातून एकाच उमेदवार अर्ज नगराध्यक्ष पदासाठी जावा, यासाठी प्रयत्न केले गेले. नगरसेवकांमध्ये समेट घडवण्यासाठी मंगळवारी साखळी रवींद्र भवनात महत्त्वपूर्ण बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, आमदार डॉ. चंद्रकांत शेटये उपस्थित होते.
यावेळी पालिकेतील गटबाजीला पूर्णविराम देत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यशस्वी शिष्टाई केली. नगराध्यक्षपदी ज्येष्ठ नगरसेवक विजयकुमार नाटेकर यांची निवड निश्चित झाली. आता नाटेकर हेच वर्षभर पदभार सांभाळतील. उर्वरित कार्यकाळासाठी सर्व चौदाही नगरसेवक त्यांना या कामात सहकार्य करतील. त्यामुळे गटबाजीच्या राजकारणाला पूर्णविराम मिळाला आहे, अशी हमी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
भाजप उद्दिष्टपूर्ती करेल : प्रदेशाध्यक्ष नाईक
बैठकीस खास उपस्थित भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी, पक्षाची ध्येयधोरणे, कार्यप्रणाली सर्व नगरसेवक, कार्यकर्त्यांना माहीत आहे. त्यानुसार ते काम करीत आहेत असे सांगितले. ते म्हणाले की, जे राजकारण आणि इतर विषय आहेत, ते आगामी काळात सर्वांना बरोबर घेऊन बसून सोडविण्यात येतील. समेट घडवून आणत पक्ष उद्दिष्टपूर्ती करेल.
समेट घडवू : डॉ. शेट्ये
आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी 'पालिकेसाठी आणि डिचोलीच्या राजकारणासाठी हा सर्वसमावेशक तोडगा आहे. पक्षाने व मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांनी योग्य निर्णय घेतला आहे, असे सांगितले. मी अपक्ष आमदार असूनही डिचोली मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. पक्षाच्या ध्येय धोरणाप्रमाणेच आपण सर्व काम करीत आहे. आगामी काळातही काम असेच सुरू राहिल. राजकीय विषयांवर पक्षश्रेष्ठी योग्य विचार करून समेट घडवून आणतील, असे त्यांनी सांगितले.
एकोपा आहे...
याबाबत मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'पालिकेच्या राजकारणात सर्व चौदा नगरसेवक एकत्र आहेत. यातून एक उमेदवार नगराध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडण्यासाठी ही बैठक होती. यात नाटेकर यांचे नाव निश्चित झाले आहे. ते पुढील कार्यकाळ सांभाळतील.
मला सुखद धक्का
दरम्यान, नाटेकर यांनी नगराध्यक्षपदी निवड ही मला स्वतःसाठी सुखद धक्का आहे. पक्षाचे प्रामाणिकपणे काम करताना आजपर्यंत मोठ्या पदाची अपेक्षा ठेवली नव्हती असे सांगितले.