पणजी - प्रश्नांचे उत्तरे सातत्याने पुन्हा पुन्हा प्रलंबित ठेऊन सरकार माहिती देणे टाळत असल्याचा आरोप करून विरोधी सदस्यांनी गोवा विधानसभेत गदारोळ केला. सभापतीच्या पटलाजवळ धाव घेतली आणि त्यामुळे सभापती राजेश पाटणेकर यांनी 12.30 वाजेपर्यंत कामकाज तहकूब केले. विधानसभा अवघी दोन दिवसांची आणि त्यातही पहिल्या दिवसाचे एक तासाचे कामकाज तहकूब केल्यामुळे प्रश्नोत्तराचा तास वाया गेला.
आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी विचारलेला कोमुनिदाद संबंधीचा प्रश्न मागील तीन अधिवेशनात प्रलंबित करण्यात आला होता. सोमवारी जेव्हा कामकाजाची सुरूवात झाली तेव्हा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तो प्रश्न पुन्हा प्रलंबित करण्यात आल्याचे सांगितले, तसेच पुढील अधिवेशनात त्याचे उत्तर दिले जाणार असल्याचे सांगितले. तसेच कोविड मृत्यु विषयीचा विरोधीपक्षनेते दिगंबर कामत यांनी विचारलेला प्रश्न तसेच आमदार रोहन खंवटे यांचाही प्रश्न प्रलंबित करण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे विरोधी सदस्यांनी जोरदार हरकत घेतली. आमदार खंवटे यांनी सरकार जबाबदारी झटकत असल्याचा आरोप केला. तसेच आपल्या एकूण 18 प्रश्नांपैकी 9 प्रश्न प्रलंबित ठेवण्यात आल्याचेही सांगितले.
गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी वृत्तपत्रावर आलेली कोविड मृत्युंविषयीची बातमी घेऊन सभापतीच्या पटलाकडे धाव घेतली. त्याला नंतर आमदार प्रसाद गांवकर, विरोधीपक्षनेते दिगंबर कामत आणि जयेश साळगांवकर हे तिथे धावले. प्रश्नांचे उत्तर हवे असा आग्रह विरोधी सदस्यांनी धरला होता तर कामकाज नियमानुसार प्रश्न प्रलंबित करण्यात आल्याचे सभापतींनी सांगितले. आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे आजारी असल्यामुळे सभागृहात उपस्थित राहू शकले नसल्याचे त्यांनी सांगितले. परंतु त्यावर विरोधीसदस्यांनी त्यावर विरोधीसदस्यांचे समाधान झाले नाही आणि त्यांनी गदारोळ चालूच ठेवला. त्यानंतर सभापतींनी 12.30 वाजेपर्यंत कामकाज तहकूब केले.