पणजी : येथील आरटीओच्या मुख्यालयातील शिपाई दामू गावडे याला खात्यातील मोटर वाहन साहाय्यक निरीक्षक अॅलिस्टर फर्नांडिस यांच्याकडून १ लाख रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपतविरोधी विभागाच्या पोलिसांनी पकडले. फर्नांडिस यांच्याविरुद्धचे सायबर गुन्ह्यासंबंधीचे एक प्रकरण मिटविण्यासाठी वरिष्ठांना देण्यासाठी म्हणून ५ लाख रुपयांची मागणी त्याने केली होती. पहिला हप्ता म्हणून १ लाख रुपये स्वीकारताना तो एसीबीच्या जाळ्यात अडकला. अॅलिस्टर यांना अलीकडेच एका सायबर गुन्ह्यात पोलिसांनी अटक करून मुक्त केले होते. सरकारी अधिकारी असल्याने त्याने अटकेची माहिती वरिष्ठांना देणे आवश्यक होते. मात्र, त्याने ती लपविली. त्यामुळे वाहतूक संचालक अरुण देसाई यांनी त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटिसीला त्याने उत्तरही दिले होते; परंतु शिपाई दामू गावडे याने त्याला हे उत्तर समाधान-कारक नसल्याने वरिष्ठ नाराज आहेत आणि या प्रकरणात अॅलिस्टर यांची नोकरीही जाऊ शकते, अशी भीती घातली. अॅलिस्टर याचा प्रोबेशन काळ असल्याने, नोकरी जाईल या भीतीने तोही घाबरला. हे प्रकरण मिटविण्यासाठी वरिष्ठांना ५ लाख रुपये द्यावे लागतील, असे दामू याने त्यांना सांगितले. पैसे देण्याची तयारी दर्शवून अॅलिस्टर यांनी १ लाखांचा पहिला हप्ता घेऊन आपण शुक्रवारी येथील आरटीओ मुख्यालयात येतो, असे सांगितले व त्याची कल्पना एसीबी अधिकाऱ्यांना देऊन सापळा लावण्यात आला. त्यानुसार दामू हा सकाळी ८.४५ च्या सुमारास पैसे स्वीकारताना रंगेहाथ पकडला गेला. दरम्यान, वाहतूक संचालक अरुण देसाई यांच्याशी संपर्क साधला असता, दामू याच्याशी आपला कोणताही संबंध नसल्याचा किंवा त्याचा फोन नंबरदेखील आपल्याकडे नसल्याचा दावा त्यांनी केला. अॅलिस्टर याला आपण कारणे दाखवा नोटिस काढली होती व त्याला त्याने उत्तरही दिलेले असल्याचे देसाई म्हणाले. दामू याला पकडण्यात आल्याचे एसीबीकडून उशिरापर्यंत काहीच लेखी आले नव्हते. त्यामुळे निलंबनाची कारवाई झालेली नाही, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
आरटीओ मुख्यालयातील लाचखोर शिपाई जाळ्यात
By admin | Published: August 29, 2015 2:42 AM