गोवा - राफेल डील प्रकरणाला काँग्रेसनं आता नवीन वळण दिले आहे. गोव्यातील आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची कथित ऑडिओ क्लिप प्रसिद्ध करुन काँग्रेसनं राफेल विमान खरेदी करारावरुन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर निशाणा साधला आहे. या वादावरुन विश्वजित राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर पलटवार केला आहे. काँग्रेसनं जारी केलेली ऑडिओ क्लिप माझी नसल्याचे सांगत राणे यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. ''क्लिपमधील संभाषण काँग्रेसकडून चुकीच्या पद्धतीनं समोर आणण्यात आले आहे. या क्लिपची लॅबटेस्ट करावी'',अशी मागणीही राणे यांनी केली आहे.
(Rafale Deal : मनोहर पर्रीकरांच्या बेडरुममध्ये राफेल घोटाळ्याची सर्व रहस्यं, काँग्रेसचा आरोप)
नेमके काय आहे प्रकरण?
गोव्याच्या कॅबिनेटमध्ये राफेल खरेदी करारासंदर्भात झालेल्या चर्चेचा हवाला देत काँग्रेसनं गोव्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांच्यासहीत मोदी सरकारवर निशाणा साधला. गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची कथित स्वरुपात एक ऑडिओ क्लिप काँग्रेसनं ट्विट केला आहे. या ऑडिओ क्लिपचा संदर्भ देत काँग्रेसनं मनोहर पर्रीकरांसहीत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये राणेंनी म्हटलंय की,''राफेलसंदर्भातील सर्व माहिती माझ्या बेडरुममध्ये आहेत. त्यामुळे माझं कोणीही वाकडं करू शकत नाही, असे मनोहर पर्रीकर यांनी म्हटले.''
यावरुनच काँग्रेसनं पंतप्रधान मोदींवरही पुन्हा निशाणा साधला आहे. पर्रीकरांकडे राफेलची सर्व रहस्यं असल्यानंच मोदी त्यांना घाबरत आहेत का? , असा प्रश्न काँग्रेसनं उपस्थित केला आहे. तसंच राफेलच्या सर्व फाईल्स पर्रीकरांच्या बेडरुममध्ये कशा आल्या आणि का आहेत?, अशी विचारणादेखील काँग्रेसनं केली आहे.
विश्वजित राणेंचं स्पष्टीकरण
दरम्यान, काँग्रेसनं प्रसिद्ध केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये छेडछाड करण्यात आल्याचा आरोपही राणे यांनी केला आहे. शिवाय, काँग्रेसनं इतक्या खालच्या स्तरावरचं राजकारण करू नये, जेणेकरुन कॅबिनेट आणि मुख्यमंत्र्यांमध्ये गैरसमज निर्माण होतील. तसंच मुख्यमंत्री पर्रीकर यांनी राफेल डील किंवा यासंदर्भातील कागदपत्रांबाबत कधीही कोणतेही विधान केले नव्हते, असे स्पष्टीकरणही राणे यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे. दरम्यान, काँग्रेस सोडून मी भाजपामध्ये प्रवेश केला. यामुळेच मला टार्गेट करण्यात येत आहे, असेही राणे यांनी सांगितले.
काँग्रेसनं जारी केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे?अज्ञात व्यक्ती : Good Evening सरविश्वजित राणे : बॉस, Good Evening. आज तीन तासांची एक कॅबिनेट बैठक झाली.अज्ञात व्यक्ती : ओके.विश्वजित राणे : ही गोष्ट सीक्रेटच ठेवा... अज्ञात व्यक्ती : हो.. हो..विश्वजित राणे : आज खूप वादावादी झाली, खूपच. नीलेशने आपल्या क्षेत्रातूनच अधिक इंजिनिअर घेतले. जयेश साळगांवकर यांना यादी मिळाली. प्रत्येकजण त्यांच्यासोबत वाद घालत आहेत. शिवाय, अद्याप नियुक्ती न झाल्यानं प्रत्येक जण नाराज आहे. अज्ञात व्यक्ती : ओके.विश्वजित राणे : बापू सुदीन ढवळीकर यांच्यासोबत वाद घालत होता. अज्ञात व्यक्ती : ओके...विश्वजित राणे : आजच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी एक विधान केले. त्यांनी म्हटलं की, राफेलसंबंधित सर्व माहिती माझ्या बेडरुममध्ये आहे. अज्ञात व्यक्ती : काय सांगताय काय तुम्ही?विश्वजित राणे : हो, मी तुम्हाला सांगतोय...
(विशेष लेखः 95 मिनिटांच्या 'मोदी शो'ने भाजपाला काय दिलं?)
(राफेल प्रकरणात माझ्यावर कुठलाच आरोप नाही; मोदींचं राहुल गांधींना उत्तर)
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी (1 जानेवारी) एएनआयला दिलेल्या मुलाखतीत राफेल कराराबाबत प्रतिक्रिया दिली. राफेल प्रकरणात माझ्यावर झालेले आरोप खासगी स्वरूपाचे नव्हते. जे आरोप झाले ते सरकारवर केले होते. संसदेत राफेल करारावर आम्ही उत्तर दिलं आहे. सर्वोच्च न्यायालयानंही या प्रकरणात उत्तर दिलं आहे. फ्रान्सच्या राष्ट्रपतींनीही उत्तर दिलं आहे, असं म्हणत मोदींनी विरोधकांना जशाच तसं उत्तर दिलं आहे.
राफेल करारावरून सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी यावरुन मोदींना लक्ष्य केलं होतं. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणात मोदी सरकारला क्लीन चिट दिली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही काँग्रेसनं राफेल करारातील भ्रष्टाचाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती.
तसेच सर्वोच्च न्यायालयाला मोदी सरकार फसवत आहेत. खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून त्यांनी न्यायालयालाचीच नव्हे तर 130 कोटी जनतेचीही फसवणूक केली आहे. देशातील नागरिकाचा कररूपी पैसा केंद्र सरकार कोणत्या पद्धतीने खर्च करत आहे, याची मागणी सरकारने देणे आवश्यक असल्याचंही काँग्रेसनं म्हटलं होतं.