पणजी - राफेल व्यवहाराच्या महत्त्वाच्या फाइल्स मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या बेडरुममध्ये असल्याचा आरोप अखिल भारतीय काँग्रेस समितीचे संशोधन विभागाचे निमंत्रक तथा खासदार राजीव गौडा यांनीही केला आहे.
पत्रकार परिषदेत एका प्रश्नावर बोलताना त्यांनी असाही आरोप केला की, ‘भाजपा सरकार या प्रकरणात माहिती लपवत आहे आणि चौकशीसाठी संसदेची संयुक्त समिती स्थापन करण्यासही टाळत आहे. सरकारने सुप्रीम कोर्टाला प्रतिज्ञापत्रातून चुकीची माहिती दिली. महालेखापालाच्या अहवालाबाबतही खोटारडेपणा केला. केंद्र सरकारकडून या प्रकरणात लपवाछपवी चालली आहे.’
‘राहुलजींची पर्रीकर भेट माणुसकीतून’
राहुल गांधी यांनी मंगळवारी (29 जानेवारी) मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विचारपूस केली त्याबद्दल विचारले असता गौडा म्हणाले की, ‘राहुलजी याआधीही फोनवरुन पर्रीकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करीत होतेच. सध्या ते गोव्यात आहेत आणि संधी मिळाली म्हणून त्यांनी पर्रीकर यांची प्रत्यक्ष भेट घेतली. राहुलजींची ही भेट माणुसकीच्या दृष्टिकोनातून होती. तशी त्यांनी केंद्रीय मंत्री अरुण जेठली यांचीही विचारपूस केलेली आहे. पत्रकार परिषदेस प्रदेश उपाध्यक्ष एम. के. शेख, मुख्य प्रवक्ता सुनिल कवठणकर, प्रवक्ता ऊर्फान मुल्ला, संशोधन विभागाच्या राष्ट्रीय समन्वयक श्रीमती लेनी जाधव उपस्थित होत्या.