लोकमत न्यूज नेटवर्क म्हापसा : कर्नाटकात होणारी विधानसभा निवडणूक, तसेच त्यानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला त्यांचा पराभव स्पष्ट दिसू लागल्याने पक्ष नेते राहुल गांधी यांना टार्गेट करीत आहे. आगामी निवडणुकीतून भाजपला मतदार त्यांची जागा दाखवून देईल, असे मत काँग्रेसने व्यक्त केले आहे.
म्हापशातील उत्तर गोवा पक्ष कार्यालयात काँग्रेसचे उत्तर गोवा अध्यक्ष विरेंद्र शिरोडकर, महासचिव विजय भिके, सदस्य एल्वीस गोम्स, तसेच जॉन नाझारेथ यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत हे मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका केली.
'भारत जोडो'ची भाजपने घेतली धास्ती
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या यशानंतर भाजप नेत्यांच्या पायाखालची जमीन सरकू लागली आहे. निवडणुकीत त्यांना त्यांचा पराभव स्पष्ट दिसू लागल्याने राहुल गांधी यांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप गोम्स यांनी केला. पण, मतदार भाजपला कंटाळल्याने होणाच्या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल, असेही ते म्हणाले.
.... तर जनतेचे पैसे परत देणार
आधार पॅन कार्डशी जोडण्यास काँग्रेस पक्ष लोकांना मदत करणार आहे. पक्ष कार्यालयांतून सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून, लोकांनी त्याचा लाभ घ्यावा. खास करून गरिबांनी पुढे यावे, तसेच ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन सेवा पुरवली जाईल, अशी माहिती यावेळी दिली. कॉंग्रेस सरकार सत्तेवर आल्यास फी माफ केली जाईल, तसेच जोडणीसाठी घेतलेली रक्कम परत केली जाईल, अशी वाही यावेळी देण्यात आली.
पॅन आधार लिंकचे शुल्कही माफ करा
पॅन कार्ड आधार कार्डाशी जोडण्यासाठी घेतले जाणारे १ हजार रुपये माफ करावे, अशी मागणी विजय भिके यांनी केली. आतापर्यंत देशात ५१ कोटी लोकांकडून शुल्क वसूल केले आहेत. गरिबांना मोफत सुविधा दिली जात नाही, यावरून सरकार लोकांचे हित जपत नसल्याचे स्पष्ट होते, असे भिके म्हणाले.
आयटी महामंडळ काय कामाचे?
सरकारने स्थापन केलेल्या आयटी महामंडळाच्या वतीने सेवा उपलब्ध करून देणे गरजेचे होते, असे भिके म्हणाले. आयटी शिक्षण घेतलेल्या युवकांचा वापर करून त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी सरकारकडून देणे अत्यावश्यक होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"