राहुलजींनी गोव्यातून नेली कुत्र्याची दोन पिल्ले!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 12:39 PM2023-08-04T12:39:20+5:302023-08-04T12:39:31+5:30
राहुल गांधी खासगी दौऱ्यानिमित्त गोव्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क म्हापसा : देशात सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याच नावाची चर्चा होत आहे. वेगवेगळ्या मुद्यावरून सरकारला घेरणारे राहुल गांधी बुधवारी खासगी दौऱ्यानिमित्त गोव्यात आले होते. गुरुवारी ते लगेच परतले. मात्र जाताना ते म्हापसा येथील सामाजिक कार्यकर्ते स्टॅनली ब्रागांझा यांच्या घरी पोहोचले. तिथूनच दिल्लीसाठी निघताना ब्रागांझा यांच्याकडील 'जॅक रसेल टेरियर' या विशिष्ट प्रजातीच्या कुत्र्याची दोन पिल्लेही नेली.
सुमारे वीस मिनिटे गांधी ब्रागांझा यांच्या निवासस्थानी होते. गांधी यांनी आपल्या निवासस्थानी दिलेली भेट अविश्वासनीय तसेच आपल्यासाठी स्वप्नवत अशी होती, अशी प्रतिक्रिया स्टॅनली ब्रागांझा यांनी दिली. दिल्लीहून गोव्यात येणे, नंतर आमच्या घरी येणे आणि श्वानप्रेम व्यक्त करणे अविश्वसनीय असे होते. या भेटीत त्यानंतर आपल्यासाठी दोन कुत्र्याची पिल्लीही निवडून नेली.
त्यांच्यासोबत झालेली भेट व चर्चा सर्वसामान्यप्रमाणे वाटली, असेही ते म्हणाले. सुमारे वीस मिनिटाहून अधिक काळ ते थांबले होते. ब्रागांझा कुटुंबीयसमवेत गांधी यांनी कॉफी घेतली, काही स्नॅक्स खाल्ले. त्यांच्या श्वानप्रेमासंबंधी चर्चा ही केली. दरम्यानच्या काळात ते श्वानासोबत खेळतही होते. त्यावेळी राहुल गांधी यांचे श्वानप्रेम दिसत होते. सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे ते आमच्याशी संवाद साधत होते, असेही ब्रागांझा म्हणाले.
एक पिल्लू स्वतः सोबत नेले
राहुल गांधी यांनी ब्रागांझा यांच्या घरी जाऊन त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधला. पत्नी व मुलांसोबत हितगुज केले. जवळपास २० मिनिटे ते थांबले होते. यावेळी त्यांना ब्रागांझा यांच्या घरातील वेगवेगळ्या प्रजातीची कुत्री दिसली. यातील जॅक रसेल टेरियर' जातीच्या कुत्र्याची पिल्ले त्यांना आवडली. यातील दोन पिल्ले त्यांनी खरेदी केली. त्यापैकी एक पिल्लू स्वतःसोबत नेले. दुसरे पिल्लू सायंकाळी त्यांच्या सहकाच्यांसोबत पाठवण्यात आले.
राहुल गांधी आमच्या निवासस्थानी येणार ही पूर्वकल्पना आम्हाला देण्यात आली होती. पण कोणी तरी आमच्याशी चेष्ट-मस्करी करत असेल असेच सुरुवातीला वाटले होते. ते आमच्या घरी येतील या गोष्टीवर आमचा शेवटपर्यंत विश्वासच बसत नव्हता. मात्र त्यांचे श्वानप्रेम त्यांना येथे घेऊन आले. - स्टॅनली ब्रागांझा, म्हापसा