राहुल गांधी गोव्यातील खाण अवलंबित, सीआरझेड आणि कोळसा प्रदूषण पिडीतांशीही संवाद साधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 07:40 PM2019-03-06T19:40:27+5:302019-03-06T19:41:22+5:30

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी येत्या ८ रोजी गोवा दौ-यावर येत असून सायंकाळी ६ वाजता त्यांचे आगमन होईल.

Rahul Gandhi will interact with CRZ and coal pollution victims in Goa | राहुल गांधी गोव्यातील खाण अवलंबित, सीआरझेड आणि कोळसा प्रदूषण पिडीतांशीही संवाद साधणार

राहुल गांधी गोव्यातील खाण अवलंबित, सीआरझेड आणि कोळसा प्रदूषण पिडीतांशीही संवाद साधणार

Next

पणजी : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी येत्या ८ रोजी गोवा दौ-यावर येत असून सायंकाळी ६ वाजता त्यांचे आगमन होईल. ताळगांव येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर आयोजित बूथ कार्यकर्ता संमेलनात ते संबोधतील तसेच या दौ-यात खाण अवलंबित, सीआरझेड तसेच कोळसा प्रदूषण पीडीतांशी चर्चा करतील आणि त्यांच्या भावना जाणून घेतील. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनल्यानंतर राहुलजी प्रथमच गोव्यात बूथ संमेलनात संबोधणार आहेत. 
पत्रकार परिषदेत ही माहिती देताना प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी या बूथ संमेलनात पक्षाचे गट सदस्य, कार्यकर्ते, पदाधिकारी मिळून १२ हजारांची उपस्थिती असेल. ‘जीत की ओर’ अशी या संमेलनाची संकल्पना असून राज्यात लोकसभेच्या दोन्ही जागा तसेच मांद्रे, शिरोडा व म्हापशातील विधानसभा पोटनिवडणुकाही काँग्रेस यावेळी जिंकेल, असा दावा केला. 
संमेलन यशस्वी करण्यासाठी गट स्तरावर बैठका घेण्यात आलेल्या आहेत. प्रदेश समितीची सदस्य, जिल्हा समित्यांवरील पदाधिकारी तसेच कार्यकर्ते, विविध आघाड्यांचे अध्यक्ष, आमदार संमेलनास उपस्थित राहतील. चोडणकर म्हणाले की, राहुलजींच्या मार्गदर्शनाने कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश येईल. आगामी निवडणुका जिंकण्यासाठी आम्हाला त्याचा उपयोग होईल. लोकसभेच्या दोन्ही जागा मोठ्या मताधिक्क्याने जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
विधानसभा पोटनिवडणुका होणार असलेल्या तिन्ही मतदारसंघांमध्ये पक्षाचे काम नेटाने सुरु आहे. पक्षाचे प्रभारी चेल्लाकुमार यांनी म्हापशात बैठका घेतल्या आहेत, असे चोडणकर यानी सांगितले. ते म्हणाले की, खाणींचा विषय गेले वर्षभर हे सरकार सोडवू शकलेले नाही. खाण व्यवसाय बंद असल्याने लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन गेले आहे. नवी सीआरझेड अधिसूचना पारंपरिक मच्छिमारांच्या मुळावर आली आहे तसेच किना-यांवरील अनेक बांधवांना त्याची झळ पोचलेली आहे. पर्यावरणाचाही प्रश्न निर्माण होणार आहे. कोळसा प्रदूषणामुळे लोक त्रस्त आहेत. या सर्व पीडीतांशी राहुलजी या भेटीत संवाद साधणार आहेत. 
पत्रकार परिषदेस पक्षाचे गोवा प्रभारी चेल्लाकुमार, प्रदेश उपाध्यक्ष एम. के. शेख, प्रदेश मुख्य प्रवक्ता सुनील कवठणकर व डॉ. प्रमोद साळगांवकर उपस्थित होत्या.
 

Web Title: Rahul Gandhi will interact with CRZ and coal pollution victims in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.