गोव्याला खास दर्जाच्या मागणीस राहुल गांधी अनुकूल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 04:36 AM2019-03-10T04:36:51+5:302019-03-10T04:37:10+5:30
गोव्याच्या जमिनी राखून ठेवणे व या प्रदेशाच्या अस्मितेचे संरक्षण करणे, यासाठी गोव्याला खास दर्जा द्यावा, अशी मागणी गोंयचो आवाज, अन्य एनजीओ तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी शनिवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे केली.
पणजी : गोव्याच्या जमिनी राखून ठेवणे व या प्रदेशाच्या अस्मितेचे संरक्षण करणे, यासाठी गोव्याला खास दर्जा द्यावा, अशी मागणी गोंयचो आवाज, अन्य एनजीओ तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी शनिवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे केली. त्यांनी या मागणीस अनुकूलता दर्शवली. गोव्यातील कोळसा प्रदूषण व अन्य गैरप्रकारांच्या विरुद्ध लढणाऱ्या कार्यकर्त्यांचे त्यांनी कौतुकही केले.
गोव्याच्या प्रदेश आराखड्याचा गैरफायदा घेत काही मंत्री जमिनी विकण्याची दारे खुले करत आहेत, मोठ्या बांधकाम व्यावसायिकांच्या घशात जमिनी घातल्या जात आहेत अशा तक्रारी सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे केल्या. केवळ जमिनी व अस्मिता राखून ठेवण्यासाठी अन्य कोणत्या राज्यांना खास दर्जा आहे हे गांधी यांनी जाणून घेतले. गांधी यांनी या मागणीविषयी अनुकूलता दाखवली.
कोळसा प्रदूषणाबाबतही गांधी यांनी चिंता व्यक्त केली. ग्रीन मालाची एमपीटीमधून वाहतूक व्हावी, एमपीटी कामगारांच्या काळजीसाठी कोळसा प्रदूषण बंद व्हावे, असा मुद्दा सामाजिक कार्यकर्त्यांनी मांडला. वास्कोतील रहिवाशांना कोळसा प्रदूषणाचे भयंकर दुष्परिणाम भोगावे लागतात, हेही गांधी यांनी जाणून घेतले. खनिज खाण अवलंबित त्यांना भेटले, तेव्हा खाणी सुरू होण्यासाठी प्रयत्न करू, असे गांधी यांनी सांगितले.