- राजेश भोस्तेकर अलिबाग - कोकण पदवीधर मतदार संघासाठी यंदा विक्रमी मतदार नोंदणी झाली आहे. रायगड जिल्ह्यातही पदवीधर मतदार नोंदणी वाढविण्यासाठी निवडणूक विभागातर्फे योग्य नियोजन केल्यामुळे २०१९ च्या तुलनेत यंदा दुपटीपेक्षा अधिक पदवीधर मतदारांची नोंदणी झाली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
कोकण पदवीधर मतदारसंघात 30 सप्टेंबरपासून मतदारांची नोदंणी सुरू करण्यात आली होती. ज्या पदवीधरांनी ३० ऑक्टोबर २०२० पूर्वी ज्यांनी पदवी अथवा पदवीत्तर परीक्षा उत्तीर्ण केली आहे अशा पदवीधरांची या कार्यक्रमा अंतर्गत नोंदणी करण्यात आली. यासाठी जिल्हा निवडणूक विभागातर्फे तालुकास्तरावर नोंदणी मोहीम घेतली होती. या मतदार नोंदणीला पदवीधर मतदार यांनी चांगला प्रतिसाद दिला. शासनमान्य पदवी आणि पदवीत्तर शिक्षण घेतलेल्या मतदारांचे अर्ज भरून घेण्यात आले. त्यामुळे २०१९ च्या तुलनेत मतदारांचा नोंदणी टक्का दुपटी ने वाढविण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे.
या वर्षी ४५ हजार ९७३ पदवीधरांनी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी रायगडात नोंदणी केली आहे. २०१९ साली कोकण पदवीधर मतदारसंघासाठी जिल्ह्यात १९ हजार ९१८ मतदारांनी नोंदणी केली होती. म्हणजेच यावर्षी पदवीधर मतदारांची संख्या गेल्या निवडणूकीच्या तुलनेत २५ हजारांनी वाढली आहे. ३० डिसेंबर रोजी मतदारसंघाची अंतिम यादी प्रसिध्द होणार आहे.
दरम्यान या कोकण पदवीधर मतदारसंघासाठी जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष प्रयत्न केले होते. शाळा, महाविद्यालये, सर्व सरकारी कार्यालये, निमशासकीय अस्थापना मध्ये पदवीधर मतदरांची नोंदणी करून घेण्यात आली. प्रत्येक तहसिल कार्यालयाच्या माध्यमातून विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे मतदार नोंदणीत वाढ झाल्याचे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यात वाढलेल्या पदवीधर मतदारांचा कौल हा कोणत्या पक्षाकडे राहणार हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.