पणजी : तुम्ही लोक पोर्तुगीज आहात अशा प्रकारचे वक्तव्य हुबळीला बसणाऱ्या रेल्वे मंत्रालयाच्या एका सरव्यवस्थापकाने केले होते. भाजपच्या आमदार अॅलिना साल्ढाणा यांनी यास तीव्र आक्षेप घेतला. हा विषय केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्यापर्यंत पोहचल्यानंतर गुरुवारी संबंधित सरव्यवस्थापकाने अॅलिना यांच्यासमोर जाहीर माफी मागितली. आपण आपले शब्द मागे घेत असल्याचे हा अधिकारी म्हणाला.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सरव्यवस्थापकाला आल्तिनो येथील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर बोलावले होते. त्यानुसार अधिकारी गुरुवारी बंगल्यावर आला. मुख्यमंत्री मंगळवारी केंद्रीय मंत्री गोयल यांच्यासोबतही बोलले होते. सरव्यवस्थापकाने माफी मागितली नाही तर त्याची बदली करूया, असे सरकारी पातळीवर ठरले होते. सरव्यवस्थापक गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर हजर झाले तेव्हा त्यांच्यासोबत रेल्वेचा अन्य एक वरिष्ठ अधिकारी हजर होता.
त्यास रेल्वे मंत्रालयाने दिल्लीहून पाठवले होते. तो रेल्वेचा अॅम्बेसिडर असल्याचे आमदार साल्ढाणा यांनी पत्रकारांना सांगितले. कुठ्ठाळीतील अनेक लोकांना घेऊनच साल्ढाणा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर आल्या होत्या. तुम्ही लोक पोर्तुगीज आहात असे विधान अधिकाऱ्याने कुठ्ठाळीतील लोकांविषयी केले होते, अशी अॅलिनाची तक्रार होती. अशा प्रकारची भाषा करणे योग्य नव्हे, असे मुख्यमंत्र्यांनी सरव्यवस्थापकाला सांगितले. आपण गैरहेतूने बोललो नव्हतो, आपल्या तोंडून चुकून तसे शब्द आले. आपली मातृभाषा हिंदी आहे. पण इंग्रजीतून बोलताना आपली वाक्यरचना चुकली, आपण त्याविषयी माफी मागतो व माझे शब्द मागे घेतो, असे सरव्यवस्थापकाने नंतर पत्रकारांपाशी जाहीर केले.
आम्ही यापुढे कधीच या रेल्वे अधिकाऱ्यासोबत कोणत्याच विषयाबाबत चर्चा करणार नाही. त्याने हुबळीचेच काम पहावे, गोव्यातील रेल्वे काम पाहू नये, असे साल्ढाणा म्हणाल्या. गोवा हा भारताचा भाग आहे. रेल्वे अधिकाऱ्याने गोमंतकीयांचा अपमान केला, असे साल्ढाणा म्हणाल्या.