मडगाव : मडगावच्या कोकण रेल्वेस्थानकावरील एका अधिकाऱ्याला चार अज्ञातांनी मारहाण करून लुटण्याची खळबळजनक घटना रविवार, दि. २५ रोजी घडली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून एक जण पसार आहे. समीर बेपारी (२६) , कासिम कुंदगन (२३), सादीक नालबंद (२२) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मिथुन राज के.के. (वय ३५) हे तक्रारदार आहेत. बेळगाव रेल्वेस्थानकावर कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत.
रेल्वेच्या एका कार्यक्रमासाठी मिथुन राज हे गोव्यात आले होते. चोरट्यांनी रेल्वेस्थानकावरच त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम व बॅग असा साडेसहा हजारांचा ऐवज लंपास केला. भादंसंच्या ३९२ कलमाखाली कोकण रेल्वे पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. पोलिस निरीक्षक सुनील गुडलर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करीत आहेत.
तक्रारदार मिथुन यांना सावर्डे येथे अमृत भारत स्टेशनच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आले होते. २५ फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजता ते मडगाव काेकण रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वरून स्वामी विवेकानंद रेल्वे हॉलिडे होमकडे जात असताना चार अज्ञातांनी त्यांना अडविले. संशयित साधारणत: २५ ते ३० वयोगटातील होते. त्यांनी तक्रारदाराला बुक्क्यांनी मारहाण करुन त्याच्याकडील एक हजार रुपये व रेल्वे इमर्जन्सी ड्यूटी पास खिशातून काढून घेतला. नंतर जबरदस्तीने जवळच्या बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रात नेऊन पाच हजार रुपये काढले व त्यांची बॅगही पळवून नेली. दरम्यान, कोकण रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली असून एक जण पसार आहे.