पणजीः रेल्वेच्या दुपदरीकरणाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी अर्धा तास देण्यात यावा, अशी मागणी करून विरोधी सदस्यांनी सभागृहात आवाज चढविला आणि सभागृहाचे कामकाज रोखून धरले. त्यामुळे सभापतींना कामकाज 15 मिनिटे तहकूब करावे लागले. मुख्य म्हणजे हा मुद्दा भाजपच्या आमदारानेच उचलला होता. (Railway tracks issue in goa)
कुळे ते वास्को दक्षीण पच्छीम रेल्वे रुळांचे डबल ट्रॅकिंग करण्याच्या प्रकल्पाला मंजुरी देताना या ज्या भागातू ही जमीन जात आहे, त्या भागातील जमिनींबाबतीत अभ्यास करण्यात आला होता काय? असा प्रश्न आमदार अँलिना साल्दाना यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाचे उत्तर देत असतानाच प्रश्नोत्तराचा तास संपल्याचे सभापती राजेश पाटणेकर यांनी जाहीर केले. परंतु आपल्याला उत्तर हवेच, असा आग्रह अँलिना साल्दाना यांनी धरला. प्रश्नोत्तराचा अवधी वाढविण्यात यावा अशीही मागणी त्यांनी केली. परंतु तसे करता येत नसल्याचे सभापतीनीं सांगितले आणि शून्य तास जाहीर केला.
यावर विरोधी सदस्यांनी साल्दाना यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी अर्धा तास चर्चासत्र ठेवण्याची मागणी केली. परंतु सभापतींनी त्याला नकार दिला. यावर विरोधी सदस्यांनी गदारोळ घातला. आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी सभापतींच्या पटलाकडे धाव घेतली आणि इतर विरोधी सदस्यांनीही त्याला साथ दिली. सभापतींनी कामकाज 15 मिनीटे तहकूब केल्याचे जाहीर केले.