पणजी : मान्सूनला परतीचे वेध लागलेले असतानाच गोव्यासह केरळ आणि कर्नाटकातील काही भागांत मंगळवारी जोरदार पाऊस पडला. केरळ व कर्नाटक जवळील भागात कमी दाबसदृश पट्टा (ट्रॉग) निर्माण झाल्यामुळे हा पाऊस पडल्याचे हवामान खात्याने म्हटले असून आणखी चार दिवस संततधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर भारतातून मान्सून माघारी परतू लागला असून पंजाब, हरयाणा व राजस्थानमधून मान्सून परतल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. मात्र, अचानक नैऋत्य मान्सून सक्रिय होण्याची प्रक्रिया दक्षिण-पश्चिम भारतात घडली आहे. कर्नाटक, केरळ व गोव्यात पावसाच्या सरी कोसळल्या. गोव्यात मडगाव, सांगे, काणकोण, वाळपई, साखळी या भागांत अधिक पाऊस पडला, तर पणजीत हलक्या सरी कोसळल्या. पणजीत केवळ १२ मिलीमीटर पाऊस पडला. हवामान खात्याचे शास्त्रज्ञ एच. हरिदासन यांना याविषयी विचारले असता त्यांनी सांगितले की, लक्षद्विप ते मराठवाडा आणि कर्नाटकमधील अंतर्गत भागात ‘ट्रॉग’ची निर्मिती झाली असून त्यामुळे या भागात पाऊस पडत आहे. गोव्यात पडलेला पाऊस हा कर्नाटकमधील ‘ट्रॉग’चा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले. आणखी चार दिवस हा पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. एका बाजूने ‘ट्रॉग’च्या प्रभावाने गोव्यात पाऊस मिळाला, तर दुसऱ्या बाजूने बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचाही गोव्याला फायदा होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या पट्ट्यामुळे आंध्र किनारपट्टीला पावसाने झोडपले आहे. आंध्र प्रदेशात अनेक ठिकाणी पुराची स्थिती आहे. त्यामुळे मान्सून सक्रिय होऊन केरळ व गोव्यात पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हरिदासन यांनी सांगितले. रविवार व सोमवारी गरमीच्या दाहामुळे होरपळल्यासारखी परिस्थिती होती, तर मंगळवारी दिवसभर गारवा राहिला. तापमान २५ अंश सेल्सीएसपर्यंत खाली आले होते, तर कमाल तापमान ३१ इंच सेल्सीअस एवढे होते. आर्द्रता ८९ टक्के एवढी होती. राज्यातील ग्रामीण भागात सकाळी खूपच वृष्टी झाली. सकाळी साडेअकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत उत्तर गोव्यातील बहुतांश ग्रामीण भागांना पावसाने झोडपून काढले. खूप दिवसांनी विजेचा लखलखाटही अनुभवास आला. दीड-दोन तासांत एवढा पाऊस गेले काही दिवस पडलाच नव्हता, असे काही शेतकऱ्यांनी सांगितले. काही रस्ते पाण्याखाली गेले होते. सकाळपासूनच वातावरण बदलले होते. पाऊस पडणार अशी चिन्हे दिसत होती. मग जोरदार वृष्टी झाली. राजधानी पणजीपेक्षा राज्यातील अन्य भागांत जास्त पाऊस पडला. गेले काही दिवस पाऊस गायब झाल्यामुळे चिंतीत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)
चार दिवस पावसाचे!
By admin | Published: September 09, 2015 2:09 AM