पणजी : हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे देशाच्या इतर भागाबरोबरच गोव्यातही झालेली पर्जन्यवृष्टी बंद झाली असली, तरी त्यामुळे निर्माण झालेला गारवा अद्याप कायम आहे. त्यामुळे उन्हाळ्यातही हिवाळा वाटावा असे वातावरण आहे. अरबी समुद्रात अचानक झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे समुद्रसपाटीपासून २ किलोमीटर उंचीवर हवामानात वेगवान बदल घडून रविवारी देशात अनेक ठिकाणी पाऊस कोसळला होता. गोव्यातही काही ठिकाणी पावसाच्या हलक्या व काही ठिकाणी मोठ्या सरी कोसळल्या होत्या. वायव्य दिशेहून किनारपट्टीच्या दिशेने वाहणाऱ्या वाऱ्याने हा पाऊस आणला होता. दोन दिवसांत परिस्थितीत कमालीची सुधारणा झाल्याची माहिती हवामान खात्याचे शास्त्रज्ञ एन. हरिदासन यांनी दिली. आता पावसाची शक्यता राहिली नाही; परंतु हवामानातील बदलानंतर उत्तरेकडून वारा सुटला आहे. उत्तर भारतात बर्फ वर्षाव सुरू असल्यामुळे हा वारा थंडी घेऊन येतो, असे हरिदासन यांनी सांगितले. राज्याचे मंगळवारी किमान तापमान हे सामान्य तापमानापेक्षा ३ अंश सेल्सियस खाली आले होते. म्हणजे १९.३ अंश सेल्सियस एवढे झाले होते. कमाल तापमानही सामान्य तापमानापेक्षा १ अंशने खाली म्हणजे ३१.३ अंश सेल्सियस एवढे नोंद झाले होते. त्यामुळे सकाळी थंडी होतीच, शिवाय दुपारीही गारवा जाणवत होता. (प्रतिनिधी)
पाऊस गेला; गारवा कायम
By admin | Published: March 04, 2015 1:54 AM