लोकमत न्यूज नेटवर्क पणजी / पेडणे / म्हापसा : रविवारी राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडला. राज्यात दिवसभरात ३ इंच इतका, तर मडगावात तब्बल ४ इंच पाऊस पडला. यामुळे सरासरी पाऊस ३४ इंच पार झाला आहे.
हवामान खात्याने शनिवारी पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाची अंदाज वर्तवून ऑरेंज अलर्ट जारी केला होता. ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहतील, असा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम असल्याचे दिसले.
राज्यात सर्वत्र संततधार चालूच असून, पडझडीच्या घटनाही घडत आहेत. धारगळ येथे राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली. वेरे येथे कारवर झाड कोसळून कारची हानी झाली. रविवारी सकाळी ८:३० पर्यंतच्या २४ तासांत राज्यात सरासरी २.३० इंच पाऊस नोंद झाला होता. परंतु त्यानंतर पावसाने अधिक जोर पकडला. ८:३० नंतर रात्री उशिरापर्यंत ४ इंचाहून अधिक पाऊस पडला. त्यामुळे हंगामी पावसाची सरासरी ३५ इंच इतकी झाली होती. मागील ६० वर्षांच्या सरासरीनुसार २ जूनपर्यंत गोव्यात ३९ इंच इतका पाऊस पडतो.
दक्षिणेत जोरदार
आतापर्यंतचा पाऊस हा दक्षिण गोव्यात जोरदार पडला आहे. म्हापसा शहराचा अपवाद वगळता उत्तर गोव्यातील सर्व भागांत पाऊस कमीच पडला. तर दक्षिण गोव्यात अधिक पडला आहे. राज्यात सर्वाधिक पाऊस नोंदवला जाणाया वाळपईत तर सर्वात कमी म्हणजे अवघा २४ इंच पाऊस पडला आहे.
मडगावला झोडपले
मडगावात रविवारी दिवसभर पाऊस पडला. मध्यम ते जोरदार सरी दिवसभर कोसळतच होता. शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. मान्सूनच्या सुरुवातीपासून यंदा मडगावात जोरदार पाऊस पडला. आतापर्यंत येथे सरासरी ४१ इंचांहून अधिक पाऊस पडला असून, हा आतापर्यंतचा राज्यातील सर्वाधिक पाऊस आहे. दिवसभरात ४ इंचाहून अधिक पाऊस या भागात कोसळला.
यंदा मान्सूनची तूट जवळजवळ भरून निघाली
यंदा मान्सूनची तूट जवळजवळ भरून निघाली आहे. अवघा चार ते पाच इंच पावसाचा फरक राहिला आहे, अशीही माहिती देण्यात आली आहे.