लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गेल्या काही दिवसांपासून राज्यात बरसत असलेल्या पावसाच्या सरी आता थांबण्याची शक्यता कमीच आहे. नैर्ऋत्य मान्सून दाखल होईपर्यंत हा पाऊस कोसळत राहणार आहे. कारण बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे मान्सून वेळेआधीच दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बंगालच्या उपसागरात बदललेल्या हवामानाचा मान्सूनवर सकारात्मक परिणाम होताना दिसत आहे. उपसागराच्या ईशान्य क्षेत्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन त्याचे 'रेमेल' चक्रीवादळात रूपांतर होऊन ते उत्तरेच्या दिशेने सरकू लागले आहे. त्याचा परिणाम देशाच्या पूर्व किनारपट्टी भागात होताना दिसत आहे. मान्सून बंगालच्या उपसागरात भारतीय भूभागाजवळ येऊन ठेपला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांतही मान्सून तामिळनाडू आणि केरळ किनारपट्टीवरून भारतीय उपखंडात दाखल होऊ शकतो. त्यामुळे कोकण व गोव्यासह इतर किनारपट्टी भागात काही ठिकाणी कोसळत असलेल्या पावसाच्या सरी आणखी जोर धरण्याची शक्यता आहे.
सत्तरी, सांगे, धारबांदोडात पावसाच्या ढगांची दाटी
दरम्यान, हवामान खात्याच्या पणजी वेधशाळेच्या रडारद्वारे टिपण्यात आलेल्या अवकाशातील छायाचित्रांत राज्यात अनेक ठिकाणी पावसाचे ढग निर्माण झालेले दिसत आहेत. ढग निर्मितीची प्रक्रियाही होताना दिसत आहे. शनिवारी सत्तरी, सांगे आणि धारबांदोडा तालुक्यांवर पावसाच्या ढगांची दाटी झाली होती. त्यामुळे या भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. मागील चार दिवसांच्या नोंदीनुसार कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसपेक्षा वर जात नसले तरी सापेक्ष आर्द्रता ही ९० टक्क्यांच्या वर जात असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे कमाल तापमान कमी राहूनही प्रखर उकाडा भासत आहे.
३१ पर्यंत बरसणार
सध्याचा पाऊस मान्सून भारतात दाखल होईपर्यंत पाऊस सातत्याने पडण्याची शक्यताही आहे. या घडामोडींमुळे गोव्यात पाऊस ३१ मेपर्यंत पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.