म्हापसा - मागील काही दिवसात पडलेला जोरदार पाऊस पडला. तसेच चतुर्थीच्या सुट्टीत पर्यटकांनी किनारी भागाकडे फिरवलेली पाठ यामुळे कळंगुट भागातील व्यावसायिकांचा व्यवसाय थंडावल्याने व्यावसायिक चिंताग्रस्त झाले आहेत. सुरू होणारा पुढील पर्यटन हंगाम कसा असेल याबाबत त्यांना आताच चिंता वाटू लागली आहे.
मागील काही वर्षाच्या तुलेनत या वर्षी पावसाने बराच जोर धरला होता. त्यामुळे इतर वर्षांच्या तुलनेत यंदा पावसाळ्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी होती. आशियातील काही पर्यटकांनी गोव्यात येण्यासाठी पर्यटकांना दिलेल्या पॅकेजसोबत अनेक देशी पर्यटक गोव्यात पावसाळ्यात येत होते. पाण्यात जाण्यावर प्रतिबंध असले तरी पर्यटनाचा आनंद ते लूटत होते. चतुर्थीच्या काळात असलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची संख्या वाढत होती; पण यंदा मात्र पावसाळ्यात पर्यटकांनी किनारी भागाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे.
पर्यटकांच्या कमतरतेमुळे किनारी भागातील बऱ्याच हॉटेल्स तसेच रिसॉर्ट व्यावसायिकांनी भाडे सुद्धा कमी केल्याचे दिसून आले. काही हॉटेल्स मालकांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलातील बुकिंगचे प्रमाण मागील वर्षापेक्षा 50 टक्क्यांहून कमी होते. पावसाळ्यात झालेल्या बुकिंगचे प्रमाण पाहता येणारा हंगाम कसा असेल यावर व्यावसायिकांना आताच चिंता वाटू लागल्याचे सांगितले आहे.
एका हॉटेल व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंका, थायलंडसारख्या देशात जाणे पर्यटकांना परवड असल्याने त्यांनी गोव्याकडे पाठ फिरवली असल्याची माहिती एका स्थानिकाने दिली. त्या देशाच्या तुलनेत गोव्यातील महागडे तसेच दर न परवडणारे असल्याने पर्यटक येण्यास टाळतात. त्याचे परिणाम झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
बागा परिसरातील एक हॉटेल व्यावसायिक शॅरवीन लोबो यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम पर्यटन व्यवसायावर झाले असल्याचे सांगितले. सुमारे 70 टक्क्यांनी पर्यटकांनी संख्या कमी झाली असल्याची माहिती त्यांनी बोलताना दिली. भाडेपट्टीवर वाहने देण्याचा व्यवसाय करणारा व्यवसायिक आलेक्स फर्नांडिस यांनी दिलेल्या माहितीनुसार, चतुर्थीच्या काळात एकही वाहन भाडेपट्टीवर गेले नसल्याचे ते म्हणाले.
रोडावलेल्या पर्यटकांच्या संख्येमुळे काही हॉटेल व्यवसायिकांनी भाडे 30 ते 40 टक्क्यांनी कमी केले आहे. एसी रुमच्या खोल्या गेल्या वर्षी 2500 रुपये प्रतीदिन याप्रमाणे देण्यात आलेल्या या वर्षी याच खोल्या 1500 पर्यंत पर्यटकांना देण्यात आल्या आहे. इतरही खोल्यांचे भाडे तसेच खाद्यपदार्थांचे भाव सुद्धा कमी करण्यात आले आहे. पर्यटकांच्या संख्येत कमी झालेल्या प्रमाणात उघड्यावर मद्यप्राशन करण्यास बंदी लागू केली असल्याने त्यात भर पडली आहे.