पणजी : पर्यावरणाला मारक ठरणाऱ्या, गरिबांच्या हिताविरुद्ध असलेल्या तसेच भावी पिढीला बाधक ठरेल, अशा प्रकल्पांविरुद्ध आवाज उठवा, असे आवाहन आर्चबिशप फिलीप नेरी फेर्रांव यांनी केले.
जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेवियर फेस्ताच्यावेळी सकाळच्या मुख्य प्रार्थनेत भाविकांना ऑनलाइन संदेश देताना ते बोलत होते.
कोविड महामारीमुळे यंदा फेस्ताची 'फेरी' भरू शकली नाही तसेच प्रार्थनाही ऑनलाइन झाल्या. दिवसभरात वेगवेगळ्या भाषांमधून ऑनलाइन प्रार्थना झाल्या. आर्चबिशप म्हणाले की, 'पर्यावरणाला बाधा पोचेल अशा प्रकल्पांविरुद्ध आम्हाला आवाज उठवावा लागेल. अशा प्रकल्पांची आम्हाला पर्वा नाही, असे म्हणून चालणार नाही.'
कोविड महामारीमुळे 'फेरी' भरू न शकल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. मेणबत्त्या तसेच मेणाचे अवयव विकणारे व्यावसायिक, चणेकार, खाजेकार यांचे मोठे नुकसान झाले. नवस फेडण्यासाठी मेणापासून तयार केलेले मानवी अवयव,मेणबत्त्यांची तसेच चणे, खाजे व अन्य पारंपरिक मिठाईची लाखो रुपयांची उलाढाल होत असे.
शेजारी महाराष्ट्र तसेच कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात भाविक या फेस्ताला येत असतात. गोवा तसेच शेजारी राज्यांमधील लाखो भाविक फेस्तात सहभागी होत असतात. विदेशातूनही दरवर्षी ख्रिस्ती भाविक या फेस्ताला मुद्दामहून हजेरी लावतात. कोल्हापूर, आजरा, गडहिंग्लज, नेसर्गी, मधवाल, देसनूर, बेळगाव, खानापूर भागातून चालत यात्रेकरू ख्रिस्ती भाविक गोव्यात येतात. परंतु यंदा महामारीमुळे भाविक येऊ शकले नाहीत.
दरवर्षी फेस्तात मुंबई तसेच अन्य ठिकाणहून आलेल्या विक्रेत्यांची संख्याही लक्षणीय असायची. तयार कपडे, बॅगा तसेच अन्य वस्तूंची विक्री करणारे स्टॉल्स दाटीवाटीने उभे करण्यात येत असत. महिलांची या स्टॉल्सवर मोठी गर्दी दिसून यायची. मात्र यंदा हे चित्र दिसले नाही.