पणजी : सरकारने 120 कोटी रुपये खर्चाच्या व 110 खाटांच्या टर्शरी केअर कॅन्सर सेंटरची शुक्रवारी बांबोळी येथे पायाभरणी केली. राज्यातील अंगणवाडी कर्मचा-यांच्या सगळ्या मागण्या सरकार विचारात घेईल. कर्मचा-यांच्या मानधनात 50 टक्के वाढ केली जाईल, असे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी महिला व बाल कल्याण खात्याचे मंत्री या नात्याने पायाभरणी सोहळ्यात जाहीर केले.
ग्रामीण स्तरावर सरकारने स्तनाचा कर्करोग तपासण्यासाठी कार्यक्रम सुरू केला आहे. युवराज सिंग फाऊंडेशनच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला जात आहे. अंगणवाडी शिक्षिका व कर्मचारी अशा प्रकारचे कार्यक्रम राबविण्यासाठी मोठे योगदान देत आहेत. केंद्रीय मंत्रालय अंगणवाडी कर्मचा-यांचे मानधन 50 टक्क्यांनी वाढविल. त्या शिवाय गोवा सरकारही 50टक्क्यांनी मानधन वाढवील, असे मंत्री राणो यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील टाटा मेमोरियल फाऊंडेशनच्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली बांबोळीचे टर्शरी केअर कॅन्सर सेंटर चालविले जाईल. अठरा महिन्यांत सेंटर उभे राहील. गोमेकॉ संकुलातच केंद्र असेल. टर्शरी केअर कॅन्सर सेंटरमध्येच मानसिक रुग्णांसाठी डे केअर सेंटरही चालेल. 70 कोटी रुपयांची वैद्यकीय उपकरणे येथे असतील, असे मंत्री राणे यांनी सांगितले.
मंत्री राणे यांच्या हस्ते दहा रुग्णवाहिकांचेही उद्घाटन करण्यात आले. गोमेकॉचे रुग्ण व त्यांचे नातेवाईक तसेच कर्मचारी व विद्यार्थ्यांना चांगला आहार पुरविण्यासाठी सरकारने सोडेक्सोकडे सात वर्षाचा करार केला आहे, असे मंत्री राणे यांनी जाहीर केले. खासदार नरेंद्र सावईकर, संचालक संजीव दळवी, दीपक देसाई, आरोग्य सचिव अशोक कुमार, आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, टोनी फर्नाडिस, डॉ. अनुपमा बोरकर आदींची यावेळी उपस्थिती होती.