पंकज शेट्ये, लोकमत न्यूज नेटवर्क वास्को: हिमाचल प्रदेशचा राज्यपाल म्हणून काम करताना तेथील लोकांचे खूप प्रेम लाभले. तेथील लोकांनी मला आपले मानले, त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. बिहारमध्येही असेच प्रेम लाभेल, अशी अपेक्षा गोव्याचे सुपुत्र असलेले बिहारचे नवे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी व्यक्त केली.
बिहारचा राज्यपाल या नात्याने दिलेली जबाबदारी मी योग्यरीत्या पार पाडेन. मी आता कोणत्या पक्षाचा नसल्याने बिहारामध्ये कुठल्या पक्षाचे सरकार आहे त्याचाशी मला काहीच फरक पडत नाही. बिहारच्या हितासाठी मी काम करेन, असे आर्लेकर म्हणाले.
राष्ट्रपती, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला बिहारसारख्या मोठ्या राज्याची राज्यपाल म्हणून जबाबदारी दिल्याने मी त्यांचे आभारी आहे. खरेतर छोटे आणि मोठे राज्य असे काहीच असत नाही, सर्व ठिकाणी काम करण्याची पद्धत एक सारखीच असते. मात्र तेथील प्रशासन, लोकांच्या समस्या, इतिहास इत्यादी गोष्टी आपल्यासाठी नव्या असतील. योग्य अभ्यास करून बिहार राज्याच्या हितासाठी काम करेन, असे आर्लेकर म्हणाले.
तेथील अनेकांच्या घरी भेट देण्याबरोबरच अनेकांना राजभवनात विविध चर्चासाठी बोलवायचो. याचे लोकांनाही आश्चर्य वाटायचे. ज्याप्रकारे गोव्यात लोकांना आदर सन्मान दिला जातो, त्याच पद्धतीने हिमाचल प्रदेशमध्ये लोक आदर सन्मान करतात, असे आर्लेकर म्हणाले.
दोन दिवसांनंतर बिहारमध्ये
- सध्या मी माझ्या 'मुलाच्या विवाहानिमित्ताने गोव्यात असून मंगळवारी मी हिमाचल प्रदेश येथे जाणार आहे.
- तेथील कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करून पुढच्या दोन दिवसांत पटना, बिहार येथे रवाना होईल, असे आर्लेकर यांनी सांगितले.
- बिहार राज्याचा राज्यपाल म्हणून माझी नियुक्ती झाल्यानंतरकरणाऱ्या अनेक गोव्यात वास्तव्य बिहारच्या नागरिकांनी मला संपर्क करून शुभेच्छा दिल्या. गोवा तसेच आपल्याविषयी त्यांना प्रेम आहे, असे आर्लेकर म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"