लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : गोव्याचे राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांची मुदत येत्या २८ जुलै रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे येत्या २४ जुलै रोजी राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने काल मंगळवारी याबाबतची घोषणा केली. राज्यसभेची गोव्यातील एक जागा व अन्य विविध ठिकाणच्या मिळून एकूण दहा जागांसाठी निवडणूक होणार आहे.
तृणमुल काँग्रेसच्या लुईझिन फालेरो यांनी राजीनामा दिलेला असल्याने पश्चिम बंगालमध्येही राज्यसभेची एक जागा रिकामी झाली आहे. त्यासाठीही २४ रोजी निवडणूक होणार आहे.
दरम्यान, तेंडुलकर यांच्या जागी आता गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना राज्यसभेवर जाण्याची संधी मिळणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास येत्या दि. ६ रोजी आरंभ होणार आहे. दि. १३ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास मुदत आहे. २४ रोजीच मतदान व मतमोजणी होईल.