लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री यांची आज दि. ३ रोजी म्हापशात होणाऱ्या जाहीर सभेची तयारी पूर्ण झाली आहे. येथील नव्या बसस्थानकावर ही सभा आज सायंकाळी ५ वाजता होणार आहे. सभा यशस्वी करण्यासाठी कालचा पूर्ण दिवस भाजपचे सभेच्या एकूण नियोजनावर तसेच तयारीवर घालवला.
लोकसभा निवडणुकीनिमित्त भाजपकडून घेण्यात येणारी ही दुसरी मोठी सभा आहे. यापूर्वी दक्षिण मतदारसंघासाठी मुरगाव तालुक्यातील सांकवाळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा मागील आठवड्यात झाली होती. ज्या प्रकारे सांकवाळ येथील सभेला लोकांचा प्रतिसाद लाभला. त्याच पद्धतीने म्हापशातील सभेला प्रतिसाद लाभण्याची शक्यता आहे. सभेसाठी २५ हजार मतदारांची उपस्थिती अपेक्षित आहे. तसा दावा पक्षाकडून करण्यात आला. सभेच्या सुरक्षेची जबाबदारी गोवा पोलिसांसमवेत केंद्रीय सुरक्षा दलावर सोपवण्यात आली आहे.
माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळेकर यांनी तयारी संबंधीचा आढावा घेणारी बैठक पक्ष कार्यालयात घेतली. तसेच त्यानंतर सभेस्थळी आढावाही घेतला. त्यांच्या समवेत नगराध्यक्षा डॉ. नूतन बिचोलकर, रुपेश कामत तसेच इतर युवा नेते उपस्थित होते. सुरक्षा व्यवस्था तसेच इतर व्यवस्थेबाबतही चर्चा केल्याची माहिती कुंकळ्ळकर यांनी दिली.
त्रुटी टाळण्यासाठी विशेष लक्ष : प्रदेशाध्यक्ष तानावडे
राज्यसभेचे खासदार प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल गुरुवारी सभा स्थळी जाऊन सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतला. सभेची तयारी पूर्ण झाली असून कोणत्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी आपण स्वतः नियोजनाचा आढावा घेतल्याचे तानावडे यावेळी म्हणाले. तसेच सभेच्या तयारीवर त्यांनी समाधान व्यक्त केले.
थेट प्रक्षेपणाचीही व्यवस्था
व्यवस्थेबद्दल युवा कार्यकर्त्यांची पुन्हा बैठक काल रात्री झाली. मंचाची व्यवस्था तसेच सजावट, खुर्चाची व्यवस्था, ध्वनी व्यवस्था यांचाही आढावा घेण्यात आला. लोकांना सभेचा आस्वाद घेण्यासाठी अडचण भासू नये, यासाठी सभेच्या परिसरात थेट प्रक्षेपणाची व्यवस्थाही केली आहे.
तगडा पोलीस बंदोबस्त
उत्तर गोवा जिल्हाधिकारी, पोलिस, वाहतूक पोलिस तसेच अग्निशमन दलाचे अधिकारी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांनी सभेच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. यावेळी काही महत्त्वाच्या सूचनाही करण्यात आल्या. सभेला येणाऱ्यांच्या वाहनांची पार्किंगची सोय देव बोडगेश्वर मंदिरानजीकच्या खुल्या जागेत केली आहे.