रमाकांत खलपांचा ख्रिस्ती, मुस्लिमांवर भरोसा; भाजपकडून हिंदू मतांवर अधिक भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2024 09:27 AM2024-05-07T09:27:53+5:302024-05-07T09:29:11+5:30
ताळगाव मतदारसंघासह काही ख्रिस्ती प्रभावित भागांमध्ये भाजपचा प्रचार तुलनेने कमी झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे उमेदवार अॅड. रमाकांत खलप यांचा तिसवाडी, बार्देसमध्ये ख्रिस्ती व मुस्लिम मतदारांवरच भरवसा दिसून येत आहे. भाजपने मात्र पूर्ण प्रचारावेळी हिंदू मतांवर अधिक भर दिला. ताळगाव मतदारसंघासह काही ख्रिस्ती प्रभावित भागांमध्ये भाजपचा प्रचार तुलनेने कमी झाला.
कुंभारजुवे मतदारसंघात ६५०० ख्रिस्ती मतदार आहेत. काँग्रेसची ही एकगठ्ठा मते मानली जातात. सांतइस्तेव्हमध्ये २५००, दिवाडी बेटावर ३०००, जुने गोवेत १०००, तर खोर्ली येथे सुमारे १५०० ख्रिस्ती मते आहेत. या भागांत काही मुस्लिम मतदारही आहेत. सांताक्रुझ मतदारसंघ कधीही भाजपकडे नव्हता. या मतदारसंघात काँग्रेसने सात वेळा विजय प्राप्त केलेला आहे. चिंबल झोपडपट्टी, सांताक्रुझ भागात काँग्रेसची पारंपरिक मते आहेत. व्हिक्टोरिया फर्नाडीस यांना ही मते मिळत होती. फेब्रुवारी २०२२ मध्ये विधानसभा निवडणुकीत ही मते रुडॉल्फकडे गेली. रुडॉल्फ हे सध्या भाजपमध्ये आहेत. या मतदारसंघातील खिस्ती मतदार काँग्रेससोबतच असल्याचा खलप यांचा विश्वास आहे.
ताळगाव विधानसभा मतदारसंघात ८ हजार ख्रिस्ती व २ हजार मुस्लिम मतदार आहेत. व्हडलेभाट ते पसरेभाट, अर्थात ताळगाव बाजारापर्यंतचा भाग ख्रिस्तीबहुल आहे. अधिकृत आकडेवारीनुसार पणजी मतदारसंघात ६२०० ख्रिस्ती, १३,००० बहुजन समाज, ३,१०० सारस्वत, १४५० मुस्लिम, ३५० गुजराती, १५० खोजा मतदार आहेत. शहरातील मुख्य टपाल खात्याच्या मागील बाजूस तसेच चर्च स्क्वेअर परिसरात काँग्रेसची पारंपरिक मते आहेत.
बार्देस तालुक्यात लोकसभा निवडणुकीत कळंगुट मतदारसंघाने काँग्रेसला अनेकदा हात दिला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मायकल लोबो या मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. आता ते भाजपत आहेत. कळंगूट मतदारसंघात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आमदार भाजपचा असताना येथे काँग्रेसी उमेदवाराला जास्त मते मिळाली होती. खलप 'कळंगूट'वरही विसंबून आहेत. शिवाय, हळदोणेतील ख्रिस्तिबहुल भाग, थिवी मतदारसंघातील खिस्ती व मुस्लिम, मांद्रे मतदारसंघात हरमल, मोरजी भागातील ख्रिस्तींवर त्यांची मदार आहे.
काँग्रेसचा मतांचा वाटा २०१४ च्या निवडणुकीत २५.६७ टक्के होता. २०१९ च्या निवडणुकीत तो वाढून ३८.३७ टक्के झाला. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात युती होती व काँग्रेसने ही जागा राष्ट्रवादीला दिली होती. उत्तर गोव्यात राष्ट्रवादीने जितेंद्र देशप्रभू यांना तिकीट दिले होते. या सार्वत्रिक निवडणुकीत देशप्रभू हे विजयाच्या समीप आले होते. देशप्रभूना त्यावेळी खिस्ती, मुस्लिम मतदारांची साथ लाभली होती.