लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: दक्षिण गोव्यात काँग्रेसने विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांचा पत्ता कट केल्यातच जमा असून कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर आहे. उत्तरेत माजी केंद्रीय मंत्री अॅड. रमाकांत खलप व पक्षाचे तरुण पदाधिकारी सुनील कवठणकर यांच्यात चुरस आहे. आज, गुरुवारी उमेदवारांची नावे अधिकृतरित्या जाहीर होण्याची शक्यता आहे.
दक्षिण गोव्यात ख्रिस्ती उमेदवारच देण्याबाबत पक्षश्रेष्ठी ठाम आहेत. त्यामुळे गिरीश चोडणकर यांचे नाव मागे पडले. विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन गेल्या पाच वर्षांत मतदारांपर्यंत पोहोचलेच नाहीत, अशा वाढत्या तक्रारी दिल्लीतही पोहोचल्या आहेत. तसेच त्यांचे वय आणि इतर गोष्टी पाहता त्यांचे नावही बाजूला काढल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. उत्तर गोव्यात हिंदू आणि दक्षिण गोव्यात ख्रिस्ती उमेदवार, असे पक्षाचे धोरण आहे.
केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, उमेदवार छाननी समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्री, गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्यासह गोव्याचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव व इतर नेते उपस्थित होते. श्रेष्ठींनी या सर्वांची मते जाणून घेतली. भाजपने दक्षिणेत पल्लवी धंपे यांच्या रुपाने हिंदू महिला उमेदवार दिलेला असल्याने काँग्रेसने ख्रिस्ती उमेदवारच द्यावा, असेही मत समोर आले. सासष्टी तालुक्यात काँग्रेसची एकगठ्ठा मते आहेत.
उत्तर गोव्यात अखेरच्या क्षणी पक्षाचे प्रदेश माध्यम विभा- गप्रमुख सुनील कवठणकर यांचे नाव पुढे आले. विजय भिके यांचे नाव मागे पडले असून खलप व कव- ठणकर यांच्यात तिकिटासाठी चुरस आहे. युवा व नवीन चेहरा देण्याच्या धोरणाचा भाग म्हणून कवठणकर यांना संधी मिळू शकते.
अंतिम निर्णय समितीचा
उमेदवारीबाबत पक्षाच्या निवडणूक समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा झालेली आहे. प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेतलेले आहे. आता समितीच काय तो अंतिम निर्णय घेईल. तसेच दक्षिण गोव्यात विरियातो फर्नाडिस यांचे नाव निश्चित झाले आहे का? असे विचारले असता ठाकरे म्हणाले की, त्याबद्दल मी काही भाष्य करू शकत नाही. उमेदवारांची नावे निवडणूक समितीच जाहीर करील व ती लवकरच घोषित होतील.