सदगुरू पाटील, निवासी संपादक
कोणत्या राजकीय नेत्याची भेट कुणाशी कोणत्या टप्प्यावर होईल हे सांगता येत नाही. आजचे राजकीय प्रतिस्पर्धी एकेकाळी एकमेकांचे साथीदेखील असतात, आता काहीजणांचा विश्वास बसणार नाही; पण ही गोष्ट खरी की, एकेकाळी रमाकांत खलप यांनी मडकई मतदारसंघात जाऊन श्रीपाद नाईक यांचा प्रचार केला होता. रमाकांत खलप आज उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून श्रीपाद नाईक यांच्याविरुद्ध लढत आहेत. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक भाजपचे उमेदवार आहेत आणि खलप रोज भाऊंविरुद्ध तोफ डागत आहेत. श्रीपादभाऊही खलपांना जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. या पार्श्वभूमीवर १९९४ नंतरचा काळ काहीजणांना आठवतो.
एकेकाळी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे बळ गोव्यात खूप मोठे होते आणि खलप हे त्या पक्षाचे सर्वात प्रभावी व लोकप्रिय नेते होते. १९९४ साली म.गो. आणि भाजपची युती झाली होती. ९४च्या विधानसभा निवडणुकीवेळी ती युती झाली नसती तर कदाचित ९४ साली मडकईत श्रीपाद नाईक जिंकलेही नसते असे जुन्या काळातील कार्यकर्त्यांना वाटते. त्या निवडणुकीत युती असूनही मांद्रे मतदारसंघात खलप मात्र हरले. चक्क संगीता परब यांनी खलपांचा पराभव केला होता. खलपभाईना वाटते की, भाजपने त्यावेळी आपल्याशी दगाबाजी केली. त्यावेळी भाजपची मांद्रेतील मते मगो पक्षाकडे न वळविता ती चक्क काँग्रेसकडे वळवली गेली असा खलपांचा दावा आहे. त्यात किती तथ्य आहे किंवा नाही ते आता कळत नाही. संगीता परब तेव्हा काँग्रेसच्या उमेदवार होत्या आणि खलपांसमोर तर त्या नवख्याच होत्या.
खलपांनी काल फेसबुकवर एक पोस्ट टाकली आहे. त्यात ते म्हणतात की, ९४च्या विधानसभा निवडणुकीवेळी मडकईत आपण श्रीपाद नाईक यांचा प्रचार केला होता. अर्थात ते खरेच आहे. श्रीपादभाऊ युतीचे उमेदवार होते. भाजपतर्फे ते लढत होते. त्यावेळी लालकृष्ण अडवाणी हे राष्ट्रीय स्तरावरील भाजपचे अत्यंत प्रबळ नेते होते. अडवाणी त्या निवडणुकीवेळी श्रीपाद नाईक यांच्या प्रचारासाठी गोव्यात आले होते. खलप म्हणतात की, अडवाणींसोबत त्यावेळी आपण श्रीपादजींचा प्रचार केला होता. अर्थात त्या निवडणुकीत भाजपला चार जागा जिंकता आल्या होत्या. पणजीत मनोहर पर्रीकर, वाळपईत नरहरी हळदणकर, मडगावमध्ये दिगंबर कामत आणि मडकईत श्रीपाद नाईक. त्यावेळी सुदिन ढवळीकर यांचा राजकीय उदय झाला नव्हता. ढवळीकर तेव्हा रिंगणात नव्हते. मडकईत त्यावेळी रवी नाईक काँग्रेसचे उमेदवार होते आणि श्रीपाद नाईक यांनी चक्क रवींचा पराभव केला होता. दोघेही भंडारी समाजातील नेते. आज ते दोघेही भाजपमध्ये आहेत आणि दिगंबर कामतदेखील. या उलट खलप आता काँग्रेसमध्ये, तरपर्रीकर हयात नाहीत.
खलप यांना वाटते की, ९४च्या निवडणुकीत भाजपने मगो पक्षाशी युती करूनही कुंभारजुवेत धर्मा चोडणकर यांचाही पराभव भाजपनेच केला होता. मगो पक्षाऐवजी कुंभारजुवेतही भाजपने आपली मते काँग्रेसकडे वळवली होती, असा खलपांचा दावा आहे. त्या निवडणुकीवेळी प्रियोळमध्ये डॉ. काशीनाथ जल्मी यांनाही भाजपने मते दिली नव्हती. पण जल्मी कसेबसे त्यावेळी पराभवापासून वाचले. अर्थात खलप यांचा हा दावा आज सर्वार्थाने मान्य होणार नाही; पण खलप यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून इतिहासाला थोडा उजाळा दिल्याचे जाणवते.
१९९९ सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी मात्र मगो व भाजप यांची युती झालीच नाही. खलप तत्पूर्वी ९६ साली लोकसभा निवडणूक जिंकून केंद्रात मंत्रीही झाले होते. ९६च्या लोकसभा निवडणुकीवेळी मनोहर पर्रीकर उत्तर गोव्यातून खलपांविरुद्ध लढले होते. त्यात खलप विजयी झाले, ९९च्या विधानसभा निवडणुकीवेळी समजा मगो- भाजप युती झाली असती तर श्रीपाद नाईक मडकईत जिंकले असते. पण युती झाली नाही आणि मडकईची जागा मगोपला गेली. सुदिन ढवळीकर यांनी ९९ साली प्रथमच मडकई मतदारसंघ जिंकला आणि आजपर्यंत सलग ते मडकईचे राजेच होऊन बसले आहेत. तिथे त्यांचा पराभव झाला नाही. श्रीपादभाऊंचा पराभव ढवळीकरांनी केला होता. पुढे भाऊ चक्क लोकसभेत पोहोचले आणि तेही आजपर्यंत अपराजित आहेत. भाईंना मागे टाकून भाऊ कष्टाने खूप पुढे पोहोचले, हेही मान्य करावे लागेल.