लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: मानवाच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे आज पर्यावरणाचे संतुलन बिघडले असून, गोमाताही विविध रोगांनी पीडित आहे. त्यामुळे गोमातेचे रक्षण करण्याचे कार्य सिकेरी गोशाळेत केले जात आहे. अल्प संसाधन वापरून असाधारण कार्य करणारे कमलाकांत तारी, कमलेश बांदेकर यांचे कार्य महान आहे. ही गोशाळा देशातील एक आदर्श गोसेवा असल्याचे गौरवोद्गार रामदेव बाबा यांनी सिकेरी मये येथील गोशाळेत काढले.
रामदेव बाबा यांनी गोशाळेची पाहणी केली व गोपूजन, वृक्षारोपण व विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे गोसेवक आहेत, तसेच मंत्री नीलकंठ हळर्णकर, आमदार प्रेमेंद्र शेट आदी पूर्ण सहकार्य देत आहेत. गोसेवकांचे मोठे सहकार्य असल्याने आज दोन हजार गोमातांची सेवा होत आहे, असे ते म्हणाले.
गोमातेच्या ठिकाणी सर्व देवतांचा वास असून, मानवी सेवेपेक्षा गोसेवा मोठी आहे. ज्यांनी गोसेवा केली त्यांचे आयुष्य उज्ज्वल बनलेले आहे. त्यामुळे ही गोशाळा गोव्याच्या तसेच भारतासाठी गौरव आहे. ही गोशाळा नसून गोतीर्थ आहे, असे रामदेव बाबांनी सांगितले. स्वामी ब्रह्मेशानंद यांनी राज्यातील प्रत्येक मंदिरात एक गोशाळा असावी. यासाठी राज्यातील सर्व आमदारांनीही पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी केले.
मंत्री नीलकंठ हळर्णकर यांनी सरकार गोशाळेसाठी सर्व ती मदत देत असल्याचे सांगितले. प्रेमेंद्र शेट यांनी सिकेरी गोशाळेचे सेवाकार्य महान आहे.रामदेव बाबा यांनी भेट देऊन ही भूमी पवित्र केल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्या हस्ते अनेक मान्यवराचा गौरव करण्यात आला. रामदेव बाबा यांना पारंपरिक समई देऊन सन्मानित करण्यात आले, कमलाकांत तारी यांनी स्वागत, तर प्रास्ताविक कमलेश बांदेकर यांनी केले. दीप प्रज्वलनाने उद्घाटन झाले. यावेळी गोसेवक दाते व मान्यवर उपस्थित होते.
डॉ. गोविंद काळे यांनी गोमातेशी संबंधित पुरातन काळापासूनच्या माहितीचे संकलन केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन स्वामीजींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रूपेश ठाणेकर, पोपट रावजी, दिलीप शेट व अनेक मान्यवर उपस्थित होते.
- रामदेव बाबा यांनी कमलाकांत तारी, कल्पिता तारी यांचा विशेष बहुमान केला. तसेच गोशाळा स्वावलंबी करण्यासाठी गोधन अर्क, गोमय समिधा तसेच विशिष्ट पद्धतीचे बीजारोपण करून चांगल्या गायी निर्माण करून आर्थिक उत्पन्न घेण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
- गोसेवा करण्यासाठी कुणीच पुढे येत नसताना कमलाकांत तारी कमलेश बांदेकर व त्याची टीम खूप चांगले काम करीत असल्याचे सांगितले. भोग संस्कृती बाजूला टाकून योग संस्कृती करण्याचे स्वप्न सरकार करण्याचे आवाहन रामदेव बाबा यांनी केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"