लोकमत न्यूज नेटवर्क नगरगाव : डबल इंजिन सरकारमुळे राज्य व देशाचा विकास झपाट्याने होत आहे. सरकारने विविध क्षेत्रांमध्ये असामान्य अशी झेप घेतलेली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी वाळपईतील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले. ते सोमवारी नगरगाव, सावर्डे व वेळगे पंचायत क्षेत्रातील नागरिकांशी संपर्क अभियानांमध्ये बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर आरोग्यमंत्री विश्वजित राणे, आमदार दिव्या राणे, माजी उपसभापती नरहरी हळदणकर, नगरगाव सरपंच संध्या खाडिलकर, भाजपा समन्वयक विनोद शिंदे, पंच सदस्य, विविध पंचायतींचे सरपंच, जिल्हा पंचायत सदस्य आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री राणे यांनी यावेळी सत्तरीमधून भाजप उमेदवारास विक्रमी मताधिक्य मिळवून देणे गरजेचे आहे, हे जनतेला पटवून दिले. केंद्र सरकारच्या मदतीमुळेच गोव्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत विकासाची गंगा पोहोचविता येणे शक्य झाले, असेही ते पुढे म्हणाले.
यावेळी बोलताना आमदार दिव्या राणे यांनी सत्तरीतील सामान्यजनापर्यंत मूलभूत गरजा पुरविणे, हे आमच्या सरकारचे ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाचे उदय सावंत यांनी सूत्रसंचालन केले. वाळपई, वेळगे व सावर्डे येथील कार्यक्रमाला स्थानिक सरपंच, पंच सदस्य तसेच नागरिकांची उपस्थिती होती.