- सूरज पवार
मडगाव: गोव्यात गाजलेल्या बेताळभाटी येथील गँगरेप प्रकरणात राम भरिया व संजीव पाल या दोघांना आज सुनावणीच्या दरम्यान न्यायालयात बेड्या ठोकून आणण्यात आले. या प्रकरणातील प्रमुख आरोपी ईश्वर मकवाना हा डिसेंबर महिन्यात पोलिसांच्या हातावर तुरी देउन पळून गेल्याच्या पार्श्र्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही संशयितांच्या हातात बेड्या ठोकूनच त्यांना सुनावणीसाठी न्यायालयात आणले होते. संशयितांना बेडया घालून आणण्यासाठी पोलिसांनी मागणी केली होती. ती मान्य करण्यात आली.
दक्षिण गोव्याच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्यायाधीक्ष विजया आंब्रे यांच्या न्यायालयात हा खटला सुनावणीस आला. हा खटला हाताळणाऱ्या सरकारी वकील आशा आर्सेकर या निवृत्त झाल्या असून, खटला हाताळण्यासाठी अजूनही सरकारी वकीलाची नियुक्ती न झाल्याने या खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्यात आला. आता पुढील सुनावणी 14 जानेवारी रोजी होणार आहे.
24 मे 2018 रोजी मध्यप्रदेशातील या तिन्ही संशयितांनी बेताळभाटी येथे निर्जन बीचवर एका 20 वर्षीय युवतीवर बलात्कार केला होता. मागाहून ईश्वर मकवाना, राम भरिया व संजीव पाल या संशयितांना फातोर्डा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नवलेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अटक करण्यात आली होती. संशयित मूळ मध्यप्रदेशातील इंदूर येथील रहिवाशी असून, ते गोव्यात पर्यटक म्हणून आले होते.
ईश्वर मकवाना हा कुख्यात गुन्हेगार असल्याचे पोलीस तपासात आढळून आले होते. या संशयितांना अटक केल्यानंतर मध्यप्रदेशातील इंदूर येथील पोलीस गोव्यात आले असता, ईश्वरचे अनेक कारनामे उघड झाले होते. मध्यप्रदेशात तो मॉस्ट वॉटेन्ड गुन्हेगार असून, त्याच्याविरुध्द तेथे सामुहिक बलात्कार, खंडणी व अन्य प्रकाराचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद आहेत.
मागच्या वर्षी 10 डिसेंबर रोजी ईश्वर मकवाना याने पणजी येथे एका इस्पितळातून पोलिसांच्या हातावर तुरी देउन पळ काढला होता. अजूनही तो सापडू शकला नाही. संशयित हे खतरनाक गुन्हेगार असल्याने व ते पळून जाण्याची भिती असल्याने त्यांना बेडया घालून न्यायालयात हजर करण्याची मागणी पोलिसांनी केली होती. ही मागणी मान्य झाल्याने कालच्या न्यायालयीन सुनावणीच्या वेळी राम भरिया व संजीव पाल या दोघांना बेडया घालून न्यायालयात आणले होते.
संशयितांना मोफत कायदा सवलतीखाली जो वकील देण्यात आला होता तो मागच्या वेळी गैरहजर राहिल्याने नवीन वकिलाची नियुक्ती करण्यासाठी न्या. आंब्रे यांनी नोटीस जारी केली होती. आता मोफत कायदा सवलतीखाली वकील अमेय प्रभूदेसाई हे संशयितांतर्फे न्यायालयात बाजू मांडत आहेत. मागच्या सुनावणीच्या वेळी सरकारी वकील आशा आर्सेकर यांनी फौजदारी आचार संहितेच्या 290 कलमाखाली फरार संशयिताच्या गैरहजेरीत सुनावणी पुढे चालविण्यासाठी अर्ज केला असता तो मान्य करण्यात आला होता.
व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे सुनावणी
दरम्यान, हा खटला या पुढे व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे चालण्याचीही शक्यता आहे. राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे काम असल्याने संशयितांना कोलवाळ येथील तुरुगांतून मडगावात आणणे कठीण असल्याने यापुढे हा खटला व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून हाताळला जाण्याची शक्यता आहे.
काल सुनावणीच्या वेळी सरकारी वकील हजर नव्हता, तसेच पिडीत युवतीची जबानी होती तीही सुनावणीच्या वेळी अनुपस्थित होती. न्यायाधीक्ष विजया आंब्रे यांनी या खटल्याचे तपास अधिकारी तथा कोलवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फिलोमिन कॉस्ता यांना पुढील सुनावणीच्यावेळी पिडीत युवतीला जबानीसाठी हजर करावे असेही न्यायाधीक्षाने बजाविले आहे.