लोकमत न्यूज नेटवर्क डिचोली: भाजपने साखळी पालिकेत बारापैकी अकरा जागा जिंकत मोठे यश संपादन केले आहे. आता नगराध्यक्षपदासाठीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. 'टूगेदर फॉर साखळी'चे नेते धर्मश सागलानी यांचा पराभव करून जायंट किलर ठरलेल्या, ज्येष्ठ नगरसेविका रश्मी देसाई या प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत. तर उपनगराध्यक्ष पदाबाबतही उत्सुकता आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री प्रमोद सावंत कर्नाटकात प्रचारात व्यस्त आहेत. मंगळवारी ते गोव्यात परतणार आहेत. त्यानंतर भाजप नेते व नगरसेवकांची संयुक्त बैठक घेऊन नावांची निश्चिती होणार आहे. नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव आहे.
भाजपमधून सहा महिला निवडून आल्या असून पहिला मान कुणाला याची उत्सुकता आहे. रश्मी देसाई या पहिल्या मानकरी ठरतील, अशी शक्यता आहे. देसाई यांनी प्रभाग चारमधून माजी नगराध्यक्ष व टूगेदर फॉर साखळीचे नेते धर्मेश सागलानी यांचा पराभव केला. त्यामुळे साखळीत विरोधकांची ताकद पूर्णपणे कमी झाली आहे. राजकीय समीकरणेही बदलली आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपदाचा पहिला मान देसाई यांना मिळणार असल्याची चर्चा आहे.
इच्छुक जादा असल्याने हे पद रोटेशन पद्धतीनेही दिले जाऊ शकते तसे झाल्यास देसाई यांच्यानंतर सिद्धी पोरोब नीकिता नाईक, दीपा जल्मी, अंजना कामत, विनंती पार्सेकर यांना संधी मिळू शकते. मात्र, मुख्यमंत्री यासंदर्भात निर्णय घेतील. तो निर्णय सर्वांना मान्य असेल, असेही सांगण्यात आले.
उपनगराध्यक्ष पदासाठी दयानंद बोर्येकर, रियाज खान, आनंद काणेकर, यशवंत माडकर, ब्रम्हा देसाई यांच्यापैकी एकाला संधी मिळेल. हे पदही रोटेशन पद्धतीने दिले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, यासंदर्भात नगरसेवक आनंद काणेकर, दयानंद बोर्येकर यांना विचारले असता, त्यांनी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीचा निर्णय मुख्यमंत्री सावंत, आमचे नगरसेवक व पक्षाचे नेते एकत्र बसून ठरवतील, असे सांगितले. पालिकेवर भाजपची पूर्णपणे सत्ता आल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.
भाजपला यश मिळवून देण्यात सावंत यांची महत्त्वाची भूमिका आहे. पालिकेत बहुमताने सत्ता आली. आता विकासातील इतर अडथळे दूर झाले असल्याचे काणेकर, बोर्येकर, पार्सेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी सांगितले.
या विकासकामांचे आव्हान
यापूर्वी साखळी शहरात अनेक विकासकामे सुरु झाली. मास्टर प्लॅनप्रमाणे उर्वरित योजना आखणे, मल:निस्सारण प्रकल्पाची पूर्तता करणे, पार्किंग सुविधा, चांगल्या क्रीडा सुविधा यासह अनेक नवे प्रकल्प राबविण्याची गरज आहे. सध्या सुरु असलेली कामे करण्यासह नव्या कामांचे नियोजन हे आव्हान नवीन पालिका मंडळासमोर असेल.