अयोध्येतील श्री राम प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त बार्देश तालुक्यात भक्तीमय तसेच उत्साहाचे तसेच राममय वातावरण पहाटे पासून तयार झाले होते. अनेक भागातून रथयात्रा, मिरवणुकी, रॅलींचे आयोजन पहाटे करण्यात आले होते.
अयोध्येतील दिमाखदार सोहळ्यानिमीत्त तालुक्यातील १५० हून अधिक मंदिरातून विविध धार्मिक विधी सकाळी पासून आयोजित करण्यात आले आहेत. राम पठण, राम रक्षा पठण, काही मंदिरात श्री सत्य नारायम महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. काही मंदिरात महायज्ञ आयोजित करण्यात आले होते. अयोध्येतील प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखवण्याची मंदिरातून सोय करण्यात आली होती. महाप्रसाद, भजन, किर्तन, सारखे कार्यक्रम आयोजण्यात आले आहेत.
सर्वत्र राम नामाच्या पताका तसेच श्रीराम, लक्ष्मण सीता यांच्या प्रतीकृती लावण्यात आलेल्या. सोहळ््यानिमीत्त करण्यात आलेल्या सुशोभीकरण, रोषणाईमुळे आकर्षणात भर पडली होती. मंदिरातून पहाटेपासून राम भक्तांची गर्दी दिसून येत होती. काही भागातून काल रविवारी मिरवणुक रॅलींचेही आयोजन करण्यात आले होते.
मच्छीमार मंत्री निळकंठ हळर्णकर, हळदोणचे आमदार अॅड. कार्लुस फरेरा, तसेच इतर मतदार संघातून आमदार सहभागी झाले होते. तसेच नगरसेवक, सरपंच, पंच सदस्य देवस्थानचे पदाधिकारी आदी मिरवणुक रथयात्रेत सहभागी झाले होते. पारंपारिक वेशभूषा हे सुद्धा आकर्षणाचे एक कारण होते. जागोजागी सुहासिनी आरती ओवाळून यात्रेचे स्वागत करताना आढळून येत होत्या.
राज्य शासनाचे सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याने शिक्षणीक संस्था सरकारी निमसरकारी कार्यालये बंद होती. शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकाने बंद ठेवण्यात आल्याने बाजारात लोकांची संख्या बरीच कमी होती. सोहळ्यानिमित्त काही पंचायतीकडून मांसाहार, मद्य विक्रीवर बंदी लागू केल्यानेही बाजारपेठा बंद ठेवण्यात आलेल्या. बार्देश तालुक्याचे निमंत्रक संजय वालावलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक राम भक्ताने दिलेल्या योगदानातून सोहळा यशस्वी होण्यास कारण ठरल्याचे सांगितले.