पणजीः देश कोरोनाच्या विळख्यात असतानाच रेवा पार्ट्या करण्याचे आणि अंमली पदार्थ सेवन धिंगाणा घालण्याचे प्रकार गोव्यात उघडकीस आले आहेत. गोवा क्राईम ब्रँचने वागातोर येथील एका फिरंगी विलास नामक बंगल्यात स्वातंत्र्यदिनाच्या उत्तर रात्री सुरू असलेल्या रेव पार्टीवर छापा टाकून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त केला आणि 23 जणांना अटक केली.
वागातोर येथे रेव पार्टीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे क्राईम ब्रँचने या ठिकाणी गुप्तपणे पाळत ठेवली होती. 15 ऑगस्टरोजी मध्यरात्री पोलिसांनी अचानाक येवून छापा टाकल्यामुळे सर्व पार्टीवाले अचंबित झाले. काहींनी पळही काढला तर 23 जणांना पकडण्यास पोलिसांना यश आले.
अटक करण्यात आलेल्यात बहुतेक सर्व गोव्याबाहेरील आहेत तसेच गोव्यातीलही आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तीन विदेशी महिलांचाही त्यात समावेश आहे. त्या ठिकाणी 9 लाख रुपयांचा अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केल्याची माहिती या विभागाचे अधीक्षक शोभित सक्सेना यांनी दिली. त्यात एक्स्टेसी हा घातक अंमली पदार्थ, एमडीएमएच्या गोळ्या आणि चरस होता. हे सर्व पदार्थ सेवन करण्यासाठी आणले होते अशी माहितीही पोलिसांकडून मिळआली आहे.
क्राईम ब्रँचचे निरीक्षक राहूल परब, नारायण चिमुलकर, महिला उपनिरीक्षक रिमा नाईक आणि संध्या गुप्ता यांचा पथकाने ही यशस्वी कारवाई केली. सर्व संशयितांवर सार्वजनिक सुरक्षा धोक्यात आणल्याचा तसेच अंमली पदार्थांच्या वापराचा गुन्हा नोंदविला आहे.