लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा: राज्यात सध्या साखळी व फोंडा पालिका निवडणुकीचे धुमशान सुरू आहे. निवडणुका जाहीर होताच भाजपने स्वबळाचा नारा दिला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. या पालिका निवडणुकीत फोंड्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. सुदिन ढवळीकरांनी कार्यकर्त्यांना स्वतंत्र दिले असताना रवी नाईकही ताकदीने उतरले आहेत. काल, सोमवारी रवी नाईक यांच्या रितेश व रॉय या दोन्ही मुलांनी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीतील रंगत वाढणार हे निश्चित झाले आहे. मगोचे केतन भाटीकर यांच्या राजकारणाला तोडीस तोड देण्याचे भाजपने ठरवल्यानेच नाईक पुत्रांना मैदानात उतरवले आहे.
फोंडा नगरपालिका निवडणुकीसाठी सोमवारी ३२ जणांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. मागच्या आठवड्यात नऊ उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. त्यामुळे उमेदवारांचा आकडा हा ४१ झालेला आहे. सोमवारी कृषिमंत्री रवी नाईक यांचे दोन्ही पुत्र रितेश नाईक व रॉय नाईक यांनी वेगवेगळ्या प्रभागांमधून अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
२०१२ च्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पुत्र उभे राहण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. रॉय नाईक हे मये येथून, तर रितेश नाईक मडकईतून लढणार होते; परंतु शेवटी रॉय यांनी माघार घेतली, तर रितेश यांनी मडकईतून निवडणूक लढवली होती. यावेळी मात्र दोघेही निवडणुकीला सामोरे जात आहेत.
हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असलेल्या भाजप मंडळ अध्यक्ष विश्वनाथ दळवी यांनीही उमेदवारी अर्ज भरलेला आहे. सोमवारी सुरुवातीलाच माजी नगराध्यक्ष किशोर नाईक यांची कन्या संपदा नाईक यांनी प्रभाग १५ मधून अर्ज दाखल केला. भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यावेळी त्यांच्याबरोबर उपस्थित होते.
माजी नगरसेवकांपैकी खालील नगरसेवकांनी पुन्हा अर्ज दाखल केला आहे. रितेश रवी नाईक (प्रभाग पाच), आनंद नाईक (१४), विश्वनाथ दळवी (प्रभाग सात), मागच्या वेळी प्रभाग आरक्षित झाल्यामुळे ज्यांची संधी हुकली होती. त्यांनीसुद्धा यावेळी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यामध्ये विद्या पुनाळेकर (प्रभाग १३), विन्सेंट फर्नांडिस ( प्रभाग ९) मागच्यावेळी नगराध्यक्षपदी असलेले शांताराम कोलवेकर यांचा प्रभाव यावेळी महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांनी आपली पत्नी दीपा कोलवेकर यांना प्रभात दहामधून उमेदवारी दिली आहे. विलियम आगियार यांनीही यावेळेस माघार घेतली असून, त्यांनी आपल्या पत्नीस उभे केले आहे.
सुदिन यांचे गूढ पत्ते!
फोंडा पालिकेत नेहमीच वर्चस्व राहिलेल्या मगोचे ज्येष्ठ नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्याशी रवीपुत्र रितेश व रॉय यांच्या उमेदवारीबाबत संपर्क साधला असता ते म्हणाले की. मी यावर आताचा काही बोलू इच्छित नाही. अर्ज माघारीच्या मुदतीनंतर भाष्य करीन. मगोप सध्या सरकारात घटक आहे. रवीपुत्र भाजपचे उमेदवार आहेत आणि याबाबत ढवळीकर काय भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.
शिक्रे यांना काँग्रेसचा पाठिंबा
या निवडणुकीत उमेदवारीला पाठिंबा न दिल्यामुळे काही लोकांनी आपल्या जुन्या पक्षाशी फारकत घेतली असून, माजी नगराध्यक्ष शैलेंद्र शिक्रे यांनी आपल्या कन्येला काँग्रेसच्या पाठिंब्यावर उभे केले आहे. कारण, शुभलक्ष्मी अर्ज दाखल करताना कॉंग्रेसचे नेते राजेश बेरेकर तिथे जातीने उपस्थित होते.
पती-पत्नीकडून अर्ज सादर
या निवडणुकीची आणखी एक खास बाब म्हणजे माजी नगराध्यक्ष गीताली तळावलीकर व त्यांचे पती राजेश तळावलीकर यांनी दोन वेगवेगळ्या प्रभागांमधून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भाजपने पाठिबा दिलेल्या १० टक्के लोकांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. मगोच्या बाबतीत खूपशा प्रभागांत अजून त्यांचे उमेदवारी अर्ज यायचे आहेत, मंगळवार हा उमेदवारी अर्ज दाखल करायचा शेवटचा दिवस आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"