- सुशांत कुंकळयेकर
मडगाव: स्वत:ला संस्कृती संपन्न राज्य म्हणवून घेणाऱ्या गोव्यात सांस्कृतिक स्थळांच्या देखभालीची कशारितीने हेळसांड केली जाते हे सहा महिन्यापूर्वी पणजीतील कमकुवत झालेल्या कला अकादमीच्या इमारतीमुळे सर्व जगाच्या लक्षात आले होते. मात्र या अनुभवाने गोवा सरकार शहाणे झाले नसावे. कारण कला अकादमीच्या मागोमाग ज्या सांस्कृतिक स्थळाचा उल्लेख होतो त्या मडगावच्या रवींद्र भवनच्या देखभालीकडे मागची काही वर्षे अक्षम्य असे दुर्लक्ष झाल्याने या वास्तूचीही स्थिती कला अकादमीच्या इमारतीसारखीच बिकट झाली आहे.
येत्या मे महिन्यापर्यंत जर रवींद्र भवनाच्या घुमटाच्या भागाची दुरुस्ती केली नाही तर या भवनाच्या सभागृहात तियात्रसह सर्व कार्यक्रम बंद करावे लागतील असा इशारा रवींद्र भवनचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी दिला. 2007 साली या भवनाच्या वास्तूची उभारणी झाली होती. मात्र सुरुवातीपासूनच या इमारतीच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने अवघ्या बारा वर्षातच ही इमारत खिळखिळी झाली असून ती सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यास सक्षम आहे का याची खात्री करण्यासाठी या इमारतीचे पूर्ण स्ट्रक्चरल ऑडीट हाती घेण्याची गरज आहे.रवींद्र भवनचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी दिलेल्या माहितीप्रमाणो, या इमारतीत मुख्य सभागृह असलेल्या पाय तियात्रिस्त सभागृहावरच्या घुमटाच्या खाली मोठ्या प्रमाणावर पाणी झिरपले असून आता ते रंगमंचावरही गळू लागले आहे. या भागाची त्वरित दुरुस्ती न केल्यास हा घुमटाचा भाग खाली कोसळू शकतो. सरकारचे या गोष्टीकडे आम्ही लक्ष वेधले आहे. मात्र अजुनही त्याकडे गंभीरतेने पाहिले जात नाही असे नाईक म्हणाले. मडगावचे रवींद्र भवन तियात्रसाठी दक्षिण गोव्यातील मुख्य केंद्र आहे. या सभागृहाच्या वरच्या भागाची दुरुस्ती न झाल्यास या सभागृहात तियात्रचे प्रयोग करणोही शक्य होणार नाही अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
मडगावात घेतलेल्या अन्य एका विषयावरील पत्रकार परिषदेत वार्ताहरांनी त्यांना रवींद्र भवनच्या सुरक्षेविषयी प्रश्न केला त्यावेळी त्यांनी वरील माहिती दिली. या गंभीर समस्येकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी लवकरच रवींद्र भवनचे कार्यकारी मंडळ त्यांना भेटणार असे त्यांनी सांगितले. रवींद्र भवनच्या जोड इमारतीचे कामही दक्षता विभागाच्या रेंगाळलेल्या चौकशीमुळे ठप्प झाले आहे. या इमारतीत असलेला अत्याधुनिक स्टुडिओही वाळवीने पोखरुन टाकला आहे. या इमारती संदर्भातही निर्णय न घेतल्यास एक दिवस तीही कोसळून पडू शकते याकडे त्यांनी लक्ष वेधले.
सध्या रवींद्र भवनाच्या मुख्य सभागृहाला गळती लागली आहे. प्रसाधन गृहेही मोडकळीस आले आहेत. बाहेरच्या पार्किंग जागेचे लॉकिंग टाईल्स विस्कळीत झाल्याने वाहन चालकांना कसरत करीत त्यावरुन वाहने न्यावी लागतात. 2017 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना त्यावेळचे मंत्री विजय सरदेसाई यांनी मडगावात बोलावून रवींद्र भवनची ही स्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने दुरुस्ती हाती घेण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन देऊन अडीच वर्षे उलटली तरीही रवींद्र भवनची दुरावस्था जैसे थी तशीच आहे. या भवनात ज्यावेळी तियात्रसारखे कार्यक्रम होतात त्यावेळी सुमारे हजारभर प्रेक्षक सभागृहात बसलेले असतात. अशा परिस्थितीत या सभागृहावरचा घुमट कोसळला तर मोठी दुर्घटना होऊ शकते याकडे शासनाने गंभीरतेने लक्ष देऊन तात्पुरत्या स्वरुपात का होईना पण त्वरित दुरुस्ती हाती घेण्याची गरज आहे.