पंडित नेहरूंविषयी पुस्तके वाचा; काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 07:47 PM2020-01-15T19:47:04+5:302020-01-15T19:47:37+5:30
ग्रंथालयात जवाहरलाल नेहरुंचे 89 खंड उपलब्ध आहेत.
पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे इतिहासाचे ज्ञान खूप कच्चे आहे. नेहरुंमुळे गोवा पोतरुगीजांच्या राजवटीतून उशिरा स्वतंत्र झाला असे विधान मुख्यमंत्र्यांनी करून स्वत:चे अज्ञान दाखवून दिले, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी बुधवारी येथे केली. त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयीची पुस्तके वाचावीत. मडगावच्या एका ग्रंथालयात नेहरुंचे 89 खंड उपलब्ध आहेत, ते कधी मुख्यमंत्र्यांनी वाचून पहावेत व वाचनासाठी वेळ मिळण्याकरिता त्यांनी अगोदर मुख्यमंत्रीपद सोडावे असे चोडणकर म्हणाले.
भारत स्वतंत्र झाला तेव्हा पूर्ण देशाने 15 ऑगस्टला आनंदोत्सव साजरा केला पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी मानणाऱ्यांनी त्या दिवशी दुखवटा पाळला होता, असे चोडणकर म्हणाले. संघवाल्यांना भारत ब्रिटिशांच्या राजवटीतून मुक्त झालेलाच नको होता. पूर्ण देश ब्रिटिशांविरुद्ध लढत होता पण संघवाले जे आता भाजपवाले झाले आहेत, ते या लढय़ात कुठेच नव्हते, असे चोडणकर म्हणाले.
मुख्यमंत्री सावंत यांना अगोदर नेहरुंचे योगदान तसेच गोवा मुक्ती लढय़ाचा इतिहास कळण्यासाठी थोडे वाचन करावे लागेल. प्रमोद सावंत यांनी विकासाबाबत गोव्याला पंधरा ते वीस वर्षे मागे नेले आहे. त्यांनी राजीनामा द्यावा, ज्यामुळे त्यांना वाचनासाठी आणि स्वत:च्या जमिनींच्याच धंद्याकडेही लक्ष देण्यासाठी मोकळीक मिळेल, असे चोडणकर म्हणाले.
कुंकळ्ळी येथे पोलिसांवर जमावाने परवा हल्ला केला. यावरून कायदा व सुव्यवस्था किती खालावली आहे ते कळून येते. तरुणांकडून पोलिसांनाही बिनदिक्कत बडविले जाते. सरकारच्या पातळीवर भ्रष्टाचार तर खूप वाढला आहे. म्हादई पाणीप्रश्न, खनिजप्रश्न आदी सर्व विषयांवर सरकार अपयशी ठरले आहे, असे चोडणकर म्हणाले.