पणजी : गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या नावे उत्तर प्रदेशमधील अमेठीमध्ये जर एखादा प्रकल्प उभा करायचा असेल किंवा एखादी सुविधा उपलब्ध करायची असेल तर गोवा सरकार ते काम निश्चितच करून देईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री सावंत गुरुवारी रात्री दिल्लीला गेले होते. शुक्रवारी त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या अध्यक्षतेखालील अर्थसंकल्पपूर्व चर्चेसाठीच्या बैठकीत भाग घेतला. शनिवारी त्यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासोबत अमेठीला भेट दिली. इराणी ह्या राहुल गांधी यांचा पराभव करून अमेठीमधून निवडून आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी अमेठीतील बरौलिया गावालाही भेट दिली. त्यांनी तेथील स्थिती पाहिली. अमेठीमध्ये जर एखादा प्रकल्प किंवा सुविधा उपलब्ध करून द्यायची असेल तर उत्तर प्रदेश सरकारने आम्हाला तसे सांगावे. आम्हाला मान्यता द्यावी, आम्ही देशाचे माजी संरक्षण मंत्री पर्रिकर यांच्या नावाने ते काम करून देऊ, असे मुख्यमंत्री सावंत यांनी लोकमतला सांगितले.
एखाद्या गावात वीजेची व्यवस्था करणो किंवा रस्ता बांधणो किंवा शिक्षणाची सोय करणो असा उपक्रम गोवा सरकार राबवू शकेल. एखादा प्रकल्प उत्तर प्रदेश सरकारने गोवा सरकारकडे सोपवावा. आम्ही तो यशस्वी करून दाखवू अशी ग्वाही आपण अमेठीमध्ये दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री आज रविवारी गोव्यात असतील. पर्रिकर हे 2014 साली मुख्यमंत्रीपद सोडून मोदी मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री म्हणून गेले होते. त्यावेळी पर्रिकर हे उत्तर प्रदेशमधूनच राज्यसभेवर निवडून गेले होते. पर्रिकर यांनीही अमेठीला काहीवेळा भेट देऊन तेथील स्थिती पाहिली होती.