ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 13 - काळ्या धनाचा बिमोड करण्यासाठी घेतलेला निर्णय चुकीचा किंवा स्वार्थापोटी असल्याचे सिद्ध झाले तर चौकात उभे करा, देश जी शिक्षा देईल ती भोगायला मी तयार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे मोपा विमानतळाच्या कोनशीला अनावरणाच्या वेळी म्हणाले. काळे धन, बेईमानी, भ्रष्टाचाराचा गेल्या ७0 वर्षांचा आजार १७ महिन्यात निपटणार, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अस आवाहनही त्यांनी केले. मोदी यांच्या या आवाहनानंतर हजारोंच्या संख्येने उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांचा गजर केला आणि मोदींना या लढाईत पाठिंबा दर्शविला.काय म्हणाले मोदीजी !- काळे धन उघड करण्यासाठी मुदत दिली होती. व्यावसायिकांनी दंडासमवेत तब्बल ६७ हजार कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा केले. दोन वर्षात सर्वेक्षण, धाडी, घोषणापत्रे या माध्यमातून सव्वा लाख कोटी रुपये तिजोरीत आले. - २ लाखांपेक्षा अधिक रकमेचे सोन्याचे खरेदी केल्यास पॅनकार्ड सक्तीचे केल्यावर निम्म्याहून अधिक खासदार हा नियम लागू करु नका, अशी विनंती करण्यासाठी आले. काही पत्रेही आली ती उघड केल्यास त्यांना त्यांच्या मतदारसंघांमध्ये फिरणेही मुश्कील होऊन बसेल. सराफांची ताकद मोठी आहे. काही खासदार या सराफांच्या खिशात आहेत. - कोणालाही अंधारात ठेवले नाही. काळ्या धनाच्या बाबतीत कठोर कारवाई होणार याचे संकेत मिळावेत, अशा गोष्टी सुरवातीपासून झालेल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत एसआयटी स्थापन केली. जनधन योजनेत गरीबातल्या गरीबाचे बँक खाते खोलून डेबिट कार्डे दिली. तब्बल २0 कोटी लोकांची खाती खोलली. या लोकांनी ४५ हजार कोटी रुपये जमा केले. - बँक कर्मचाऱ्यांवर ताण आला ही खरी गोष्ट त्यासाठी ते अभिनंदनासही पात्र आहेत. वर्षभर केले नाही एवढे काम आठ दिवसात करावे लागले. तडचण झाली परंतु त्याचबरोबर काही निवृत्त बँक अधिकाऱ्यांनीही सरकारचे अभिनंदन करुन आपणहून सेवा देण्याची तयारी दाखवली. - नोटा चलनातून काढल्या हा माझा अहंकाराचा मुद्दा नव्हे. मलाही त्रास झाला. काळा पैसा असेल तर बँकेत भरा, नियमानुसार दंड भरा आणि मुख्य प्रवाहात या, आणि जर का तयारी नसेल तर गाठ माझ्याशी आहे. काळे धन उकरुन काढण्यासाठी लाखभर तरुणांना नोकऱ्या देऊन कामाला लावीन. - काळे धन बाहेर काढण्यासाठीची ही योजना निश्चितच सफल होणार हा विश्वास आहे. देशातील १२५ कोटी जनतेपैकी अवघे काही लाख सोडले तर सर्वजण या निर्णयाच्या पाठीशी आहेत.
..तर देश देईल ती शिक्षा भोगायला तयार : मोदी
By admin | Published: November 13, 2016 7:31 PM