पणजी - माझ्या वडिलांनी मला सहकारी पक्षांवर तसेच सहकाऱ्यांवर विश्वास ठेवण्यास शिकविले. ते स्वत: विश्वास ठेवायचे. मात्र काही वेळा विश्वास बॅकफायर होतो. मलाही नुकताच तसा अनुभव आला, अशा शब्दांत देशाचे माजी संरक्षण मंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मनोहर पर्रीकर यांच्यावरील पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात पुत्र उत्पल बोलत होते. मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर उत्पल पर्रीकर हे पणजीत भाजपाच्या तिकीटाचे दावेदार होते. मात्र भाजपाने त्यांना तिकीट नाकारले. या पार्श्वभूमीवर उत्पल व्यक्त झाले असावेत प्रकारची चर्चा सुरू झाली आहे. आपण तीस वर्षे घरात राजकीय वातावरण पाहिले. कारण वडील राजकारणात कायम सक्रिय राहिले. त्यामुळे आपण बोलत असताना राजकीय संदर्भ येतातच. आम्ही कधी वडिलांच्या राजकारणात हस्तक्षेप केला नाही पण केंद्रातील संरक्षण मंत्रीपद सोडून गोव्यात मुख्यमंत्री म्हणून माझे बाबा परत येण्याचा निर्णय घेऊ लागले तेव्हा एकदाच मी त्यांना तुम्ही असे का करता असे विचारले होते, अशीही आठवण उत्पल पर्रीकर यांनी सांगितली आहे.
उत्पल यांनी भावना व्यक्त केल्या तेव्हा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे व्यासपीठावर होते. आपण मनोहर पर्रीकर यांच्यामुळेच मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचलो असे सावंत यांनी नमूद केले. लोकमतचे गोव्यातील ब्युरो चिफ सदगुरू पाटील यांनी पर्रीकर यांच्या राजकीय वाटचालीवर व योगदानावर लिहिलेल्या पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मनोहर पर्रीकर यांना हिरो म्हणूनच समजून घ्यावे लागेल, असे ज्येष्ठ लेखक विश्रम गुप्ते प्रमुख वक्ते या नात्याने बोलताना म्हणाले. मनोहर पर्रीकर यांच्या सवयी, त्यांच्या स्वभावातील सकारात्मक व नकारात्मक गोष्टी, त्यांनी फिरविलेले काही निर्णय व अन्य अनेक बाबींवर या पुस्तकात लेखकाने लिहिले आहे. देशाचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी या पुस्तकाची हिंदी व इंग्रजी आवृत्ती लवकर यावी अशी अपेक्षा आपल्या भाषणात व्यक्त केली आहे.