लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : आम आदमी पक्षाने 'इंडिया'चे उमेदवार म्हणून आमदार वेंझी व्हिएगश यांचे नाव जाहीर करून काही तासही उलटले नसताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर व आपचे राज्य समन्वयक अॅड. अमित पालेकर हे दोघेही काल दिल्लीला जाऊन श्रेष्ठींकडे चर्चा करून आले. दोन्ही पक्षांमध्ये 'समेट' झाल्याची माहिती मिळते.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्याशी 'लोकमत'च्या या प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी पालेकर व आपण दिल्लीला गेलो होतो, तसेच समेटाच्यादृष्टीने सकारात्मक अशा गोष्टी चालू आहेत, यास दुजोरा दिला. ते म्हणाले की, भाजप विरोधातील मते कोणत्याही प्रकारे दुभंगू नयेत यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. आणि दिल्लीत केंद्रीय नेत्यांशी चर्चा केल्यानंतर यया बाबतीत समेटाच्यादृष्टीनेही आमची पावले पुढे पडत आहेत." आम आदमी पक्षाने दोन दिवसापूर्वीच वेंझी यांचे नाव दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून जाहीर केले होते. पत्रकार परिषदेत अॅड. पालेकर यांनी वेंझी हे इंडिया युतीचे उमेदवार असल्याचे स्पष्ट करून काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी वेंझी याना पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले होते.
दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात सध्या काँग्रेसचे फ्रान्सिस सार्दिन हे खासदार आहेत. या मतदारसंघात काँग्रेसचा खासदार असताना आम आदमी पक्षाने अचानक उमेदवार कसा काय जाहीर केला, यावरून काँग्रेसमध्ये खळबळ उडाली होती परंतु आता यावर समेट घडवून आणला जात आहे.
दिल्लीत खलबते
पालेकर यांनी अचानक पत्रकार परिषद घेऊन उमेदवार आहीर केल्याने कॉंग्रेसमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी अमित पालेकर यांना दिल्लीला घेऊन जाण्यासाठी पुढाकार घेतला व काल दिल्लीत या विषयावर पक्षश्रेष्ठीकडे चर्चाही घडवून आणली. भाजप उमेदवाराचा पराभव करायचा असल्यास दोन्ही मतदारसंघांमध्ये काँग्रेस व एकत्र हवा, असे श्रेष्ठींचेही मत पडले.
'इंडिया युती'ला अनुकूल तेच होईल
अॅड. अमित पालेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही दिल्लीत बैठक झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. ते म्हणाले की. इंडिया युती ला अनुकूल अशाच गोष्टी घडतील, गोव्यात भाजप विरोधकांची मते दुभंगू नयेत, यासाठी आमचे प्रयल चालू आहेत.