पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे शुक्रवारी पुन्हा सायंकाळी राजभवनावर गेले व राज्यपाल सत्यपाल मलिक यांना ते भेटून आले. राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्यात समेट घडून आल्याची चर्चा त्यामुळे सुरू झाली. विशेष म्हणजे राज्यपालांच्या कार्यालयातून शनिवारी सकाळी प्रसिद्धीपत्रक जारी केले गेले व मुख्यमंत्र्यांनी कोविड व्यवस्थापनाच्या विषयाबाबत राज्यपालांच्या सूचनांचे पूर्ण पालन केले जाईल, अशी ग्वाही दिल्याचे पत्रकाद्वारे जाहीर केले गेले. एकंदरीत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न राजभवनाने केल्याचे राजकीय गोटात मानले जात आहे.
मुख्यमंत्री शुक्रवारी पुन्हा राज्यपालांना भेटल्याचे वृत्त केवळ ‘लोकमत’नेच शनिवारी प्रसिद्ध केले आहे. त्या भेटीचा तपशील जाहीर झाला नव्हता, तो तपशील मुख्यमंत्री कार्यालयानेही जाहीर केला नव्हता. राज्यपालांच्या सचिवांनी तो पत्रकाद्वारे जाहीर केला. गुरुवारी राज्यपालांनी गोवा सरकारला फटकारले होते.
मुख्यमंत्री व राज्यपाल यांच्यातील शाब्दिक चकमक लोकांसमोर आली होती. आपण मीडियाला दोष दिलाच नव्हता, मुख्यमंत्र्यांनी उगाच पत्रकारांना तसे सांगितले असे राज्यपाल म्हणाले होते. मात्र, शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्री येऊन भेटल्यानंतर राज्यपाल शांत झाले, असे चित्र दिसते. कारण राजभवनवरून जारी झालेल्या प्रसिद्धीपत्रकात पूर्वीच्या वादाचे कोणतेही प्रतिबिंब नाही. कडवटपणा टाळला गेला आहे.
सरकारला पूर्ण पाठिंबा
च्शुक्रवारी मुख्यमंत्री पुन्हा भेटले तेव्हा त्यांची राज्यपालांशी कोविड व्यवस्थापनाबाबत अधिक तपशिलाने चर्चा झाली व राज्यपालांनी कोविडविरोधी लढ्यात सरकारला पूर्ण पाठिंबा दिला असल्याचे राजभवनाकडून जाहीर करण्यात आले. च्राज्यपालांची निरीक्षणे व सूचना यावर लवकरच कृती केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली, असेही राज्यपालांच्या सचिवांनी स्पष्ट केले आहे. च्राज्याच्या हिताच्या दृष्टीने कोविडविरोधी लढा जिंकण्यासाठी पूर्ण समन्वय व सहकार्याची भावना ठेवून काम करण्याचा निर्धार राज्यपाल व मुख्यमंत्री या दोघांनी मिळून केल्याचेही राजभवनाने पत्रकात नमूद केले आहे.