लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : लोकसभेच्या दोन जागांसाठी राज्यात काल, मंगळवारी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे. कुठेही अनुचित प्रकार न घडता सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.
पर्यंत सर्वाधिक ८८.६१ टक्के, साखळीत ८७ टक्के तर वाळपईत ८४.५० टक्के मतदान झाले आहे. यावेळेस भाजपने सुरवातीपासूनच जोर लावला होता. पंतप्रधानांसह गृहमंत्र्यांची सभा झाली. तर विरोधी काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीची धुरा स्थानिक नेते व कार्यकर्त्यांवर होती. आता ४ जून रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
जास्त उष्णतेमुळे दुपारी १ ते ३ पर्यंत मतदानाचे प्रमाण कमी होते. परंतु नंतर वेग वाढला आणि ताशी ९ ते १० टक्क्यांपर्यंत मतदान झाले. दुपारी १ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ५० टक्क्यांवर पोचली होती त्यामुळे यावेळी विक्रमी मतदान होईल, अशी अटकळ बांधण्यात येत होती.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ७६.८६ टक्के मतदान झाले होते. तर गेल्या म्हणजेच एप्रिल २०१९ साली झालेल्या निवडणुकीत ७४.७२ टक्के मतदानाची नोंद झाली होती. या निवडणुकीत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालेले आहे. दक्षिण गोव्यात कांसावली येथे सेंट थॉमस स्कूल मतदान केंद्रावर सीआरपीएफ जवानांनी पोलिंग एजंटना बाहेर काढल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. ही एकमेव घटना वगळता कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. उत्तर गोवा ७६.५४ टक्के, तर दक्षिण गोवा ७३.९० टक्के मतदान झाले.
देशात दुसरा क्रमांक
गोमंतकीयांना लोकसभेसाठी मतदान करण्यास मोठा प्रतिसाद दिला आहे. राज्यात विक्रमी ७५ टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद होत आहे. विशेष म्हणजे तिसऱ्या टप्प्यात गोव्यात झालेले मतदान हे देशात दुसऱ्या क्रमांकाचे आहे. ७५.२६ टक्क्यांसह आसाम पहिल्या क्रमांकावर आहे.
७५ टक्क्यांहून अधिक नोंद....
राज्यात काल लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. गोमंतकीयांनी सकाळपासून मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत आलेल्या माहितीनुसार दोन जागांसाठी राज्यात जवळपास ७५ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. ४ जून रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांकडून मतदारांचे आभार
गोमंतकीयांनी मतदानाला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्यामुळेच लोक मतदानासाठी बाहेर पडले. त्यामुळेच भाजप दोन्ही जागांवर विजय मिळवेल, असा दावा मुख्यमंत्री सावंत यांनी केला आहे. उत्तर गोव्यात १ लाखापेक्षा अधिक मताधिक्य तर दक्षिणेत ६० हजारांहून अधिक मताधिक्चय भाजपला मिळेल. मोदींच्या विकसित भारत, विकसित गोव्यासाठी हे मतदान झालेले आहे. मोदींचे स्वप्न साकार करण्यासाठी हे मतदान झालेले आहे. शांततेने लोकशाहीच्या उत्सवात मतदार सहभागी झाले त्याबद्दल आभार व्यक्त करतो, असेही ते म्हणाले.
४ जून रोजी मतमोजणी व निकाल
लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी काल मतदान प्रक्रियेला गोमंतकीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उत्तर गोव्यातील मांद्रे, डिचोली, शिवोली, मये, साखळी, पयें, वाळपई व प्रियोळ येथे मोठ्या प्रमाणात मतदार घराबाहेर पडले तर पणजी, ताळगाव, सांताक्रुज, सांत आंदेत सरासरी ६५ टक्क्यांपर्यंत मतदान झाले. तर दक्षिण गोव्यात फोंडा, शिरोडा, मडकई, मुरगाव, दाबोळी, कुठ्ठाळी, कुकळ्ळी, केपे, कुडचडे, सावर्डे, सांगे, काणकोण येथील मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. तर नुवे, कुडतरी, फातोर्डा, मडगाव, बाणावली, नावेली, वेळळी येथे तुलनेने कमी मतदान झाले.