लोकमत न्यूज नेटवर्क पणजी येत्या ऑक्टोबरपासून : कर्मचारी निवड आयोगामार्फत भर सुरू होईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभेत स्पष्ट केले. यापुढे सरकारी खात्यांमध्ये नोकर भरती या आयोगामार्फत पारदर्शक पद्धतीने होईल, असे सरकारचे म्हणणे आहे. अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.
भू बळकाव प्रकरणी चौकशी आयोगाने काम सुरू केले आहे. दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोबाईल फॉरेन्सिक युनिट येतील असे मुख्यमंत्री म्हणाले. किनारी सुरक्षा वाढवली आहे. पोलिसांना पुरेशी उपकरणे दिलेली आहेत, काही ठिकाणी वाहने कमी आहेत.
लवकरच पर्यटन पोलिस विभाग स्थापन केला जाईल. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेची चिंता दूर होईल. भू बळकाव प्रकरणी अंतिम अहवाल लवकरच प्राप्त होईल. आता सायबर गुन्ह्यांबाबत तक्रारी नोंदवण्यासाठी सायबर विभागाकडे जावे लागणार नाही. जवळच्या पोलिस स्थानकातही त्या नोंदवता येतील. तेथून मग सायबर विभागाकडे हस्तांतरीत करता येतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
काय म्हणाले मुख्यमंत्री ?
भाषा भवन लवकरच बांधणार. दक्षता खात्याकडे २,७४३ तक्रारी आल्या पैकी १,९०० निकालात काढल्या. कोलवाळ कारागृहातील अनेक कैदी पदवीधर व द्वीपदवीधर झाले आहेत. एकाने तर कायद्याची पदवी घेतली आहे. चालू वर्षी कोकणी चित्रपट महोत्सव होईल. सरकार लवकरच जाहिरात धोरण निश्चित.ऑफशोअर (नदी पात्रातील) कॅसिनोंना आणखी परवानगी देणार नाही. जेटीचे बांधकाम सागरमाला अंतर्गत केवळ प्रवाशांच्या वाहतु कीसाठी आहे. माल वाहतुकीसाठी या जेटी नाहीत.
बेकायदा कॅसिनो बंद करणार
बेकायदा कॅसिनो बंद करणार असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कायदेशीर कॅसिनोच राहणार. गस्तीसाठी आणखी दुचाक्या ताफ्यात घेतल्या जातील. मुख्यमंत्री म्हणाले की, तीन नवीन शिड्या अग्निशामक दलासाठी घेतल्या जातील. सध्या २३ मिटर उंचीपर्यंत पोचणारीच शिडी आहे. मुंबईत जुहू येथे असलेल्या गोवा भवनची डागडुजी पूर्ण झाली असून येत्या तीन महिन्यांत ते पूर्वीप्रमाणे खुले केले जाईल. दिल्लीच्या गोवा निवासचेही नूतनीकरण केले जाईल. बांधकाम खाते हे काम करणार आहे.
१३० गृहरक्षकांना....
वयाची ५० वर्षे पूर्ण केलेल्या व १० वर्षे गृहरक्षक म्हणून काम केलेल्या १३० जणांना थेट पोलिस सेवेत भरती केले जाणार असून अधिवेशन संपण्याआधी त्यांना पत्रे दिली जातील, असे सावंत म्हणाले. गुन्हे उकल ८५ टक्के होत आहेत. देशात हे प्रमाण सर्वात जास्त आहे असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे. एक गस्ती नौका ताफ्यात घेतली आहे.
स्वा. सैनिकांच्या ६० मुलांना नोकऱ्या
स्वातंत्र्य सैनिकांच्या ६० मुलांना येत्या १५ ऑगस्ट रोजी सरकारी खात्यांमध्ये नोकरीची नियुक्तीपत्रे दिली जातील. तसेच उर्वरीत जे कोणी आहेत त्यांना ऑक्टोबरपर्यंत पत्रे देऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले. १० कोटींच्या कथित कॅसिनो घोटाळ्याची चौकशी होईल. गृह खाते व जीएसटी खाते चौकशी करील, असे सावंत म्हणाले.