पणजी : महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाशी सध्या तरी भाजपची युती आहे. युतीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सर्व सदस्यांचे मत जाणून घेतले जाईल, असे गोवा भाजपचे ज्येष्ठ नेते व संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी येथे सांगितले.जेव्हा सदस्य संख्या हजारो असते तेव्हा कोणत्याही विषयाबाबत मतभिन्नता असणे हे स्वाभाविक असते. प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते. आमच्याकडे आमदारांचीच संख्या २१ आहे आणि त्यापेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांची संख्या आहे. प्रत्येकाचे मत ऐकल्यानंतर आम्ही काय तो निर्णय घेऊ, असे पर्रीकर म्हणाले.रविवारी भाजपची उच्चस्तरीय बैठक पार पडली. त्या बैठकीवेळी म.गो. पक्षाविषयी चर्चा झाली नाही; पण भाजपचे काही आमदार म.गो. पक्षाशी युती तोडा, अशी मागणी सातत्याने करत आहेत. काही आमदार बांधकाम खात्याविषयी तक्रार करतात. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी पर्रीकर यांना विचारले. आतापर्यंत कोणताच निर्णय झालेला नाही. जिल्हा पंचायत निवडणुकाही भाजप-मगोने एकत्रित लढविल्या, असे पर्रीकर यांनी नमूद केले. भाजपमधील काहीजण युतीविषयी जे भाष्य करतात, ती त्यांची व्यक्तिगत भावना आहे, असे पर्रीकर म्हणाले. (खास प्रतिनिधी)
मगोबाबत सर्वसंमतीने निर्णय
By admin | Published: May 05, 2015 1:08 AM