प्रादेशिक पक्षांनी विचारधारा स्पष्ट करावी: माणिकराव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 08:26 AM2024-01-11T08:26:02+5:302024-01-11T08:26:36+5:30
'इंडिया' आघाडीच्या बाबतीत गोवा फॉरवर्डला उद्देशून टोला
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्यातील प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसच्या विचारधारेने चालणार की भाजपच्या याबाबत आधी आपली भूमिका स्पष्ट करावी. त्यानंतरच 'इंडिया' आघाडीत समावेशाबद्दल बोलता येईल, असे काँग्रेसचेगोवा प्रभारी माणिकराव ठाकरे म्हणाले.
पत्रकार परिषदेत एका प्रश्नावर उत्तर देताना ते बोलत होते. आरजीने उमेदवार जाहीर केले आहेत, परंतु गोवा फॉरवर्डची भूमिका अजून स्पष्ट नाही. त्यामुळे ठाकरे यांनी हे विधान फॉरवर्डला उद्देशूनच केल्याचा अर्थ निघतो.
ठाकरे म्हणाले की, 'इंडिया आघाडीतील राष्ट्रीय पक्ष ठरले आहेत. प्रादेशिक पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल.'
आम आदमी पक्ष दक्षिण गोव्यात तिकीट मागत असल्याने त्याबद्दल विचारले असता असा कोणताही प्रस्ताव अजून माझ्याकडे तरी त्या पक्षाकडून आलेला नाही. आरजीने उमेदवार जाहीर केल्याने त्याबद्दल विचारले असता त्या पक्षाला किती महत्त्व द्यायचे हा प्रश्न आहे.
राज्यात काँग्रेससाठी लोकसभेसाठी चांगली स्थिती असल्याचे नमूद करून ते म्हणाले की, 'मला विश्वास आहे की आम्ही पक्ष संघटना आणखी मजबूत करू. मी पक्षाच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्याही बैठका घेतल्या. आमच्याकडे चांगले केडर आणि नेते आहेत. आम्ही उत्साहाने पुढे जाऊ आणि निवडणुका जिंकू.'
डबल इंजिनचे सरकार भ्रष्टाचारात गुंतले असून, सर्वच बाबतीत अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्र आणि राज्य अशा दोन्ही सरकारचे अपयश लोकांपर्यंत पोहोचवू बरोबर काय आणि चुकीचे काय हे लोकांना पटवून देऊ. भाजप लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत आहे हे लोकांना माहीत आहे.
'त्यांना' जनताच धडा शिकवेल
आमदारांच्या पक्षांतराबद्दल बोलताना ते म्हणाले की, याचा अर्थ असा नाही की जेव्हा नेते पक्षांतर करतात, तेव्हा निष्ठावंत समर्थकदेखील बदलतात. आम्ही कार्यकर्त्यांशी, लोकांशी बोललो आणि त्यांना माहीत आहे की पक्षांतर लोकशाहीला कसे हानी पोहोचवत आहे. पक्षांतर करणाऱ्यांना धडा शिकवतील. तेलंगणातही लोकांनी हे दाखवून दिले आहे.' ठाकरे म्हणाले की, भाजप धर्मावरून लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे राहुल गांधींनी 'भारत जोडो यात्रा' काढली. "आता आम्ही मणिपूरमधून सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी 'न्याय यात्रा' सुरू करणार आहोत.
अपात्रता प्रकरणी राजकीय निर्णय
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गटच खरी शिवसेना असा जो निवाडा अपात्रता याचिका निकालात काढताना दिला आहे त्याबद्दल विचारले असता ठाकरे म्हणाले की, 'या अपात्रता याचिकांच्या बाबतीत राजकीय निर्णय होणार. न्याय मिळणार नाही, हे सर्वानाच ठावुक होते. या निवाड्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याबाबतचा निर्णय उद्धव ठाकरे गट घेईल.